त्या १८ गावातील विकासकामांना चालना देण्याची कुणाल पाटील यांची मागणी पालिका आयुक्तांची घेतली भेट
कल्याण , कुणाल म्हात्रे : केडीएमसी मध्ये पुन्हा समाविष्ट केलेल्या १८ गावांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून विकासकामं खोळंबली होती. आता हि गावे पुन्हा महापालिकेत आल्याने आयुक्तांनी या १८ गावांमध्ये लक्ष घालून येथील विकासकामांना चालना देण्याची मागणी माजी नगरसेवक कुणाल पाटील यांनी पालिका आयुक्तांची भेट घेऊन केली आहे.
कल्याण डोंबिवली महानगर पालिकेतील २७ गावांपैकी १८ गावे शासनाने वगळून त्यांची वेगळी नगरपरिषद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने उच्च न्यायालयाने हि गावे पुन्हा महापालिकेतच ठेवण्याचा निर्णय दिला. हि गावे पालिकेतून वगळल्यापासून येथील विकासकामे खोळंबली आहेत. हि गावे पालिकेत आल्याने येथील विकास कामांना वाव मिळणार आहे.
या १८ गावातील आडीवली - ढोकळी प्रभागांतील अंतर्गत रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. मधल्या काळात नागरिकांना प्रचंड समस्यांचा सामना करावा लागला आहे व अंतर्गत रस्त्यांवर जीवघेणे खड्डे पडले आहेत. या तसेच अन्य समस्यांकडे आयुक्तांचे लक्ष वेधण्यासाठी माजी नगरसेवक कुणाल पाटील यांनी पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेत निवेदन सादर केले. यावेळी या १८ गावांमधील विकास कामे लवकरात लवकर चालू करण्याची मागणी केली.

Post a Comment