"अदानी-शाईन" सिक्युरिटीच्या मदतीने एन.आर.सीतील कामगार वसाहतीतील १३ खोल्यांवर कारवाईचा बडगा
कल्याण, कुणाल म्हात्रे : एन.आर.सी कंपनीच्या मोहने येथील कामगार वसाहतीतील किमान तेरा खोल्या व्यवस्थापनाने शाईन सिक्युरिटी व अदानी सिक्युरिटीच्या संरक्षणात तोडल्याने वसाहतीत राहत असणाऱ्या कामगार परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. बंद असणाऱ्या एन.आर.सी कारखान्याकडे हजारो कामगारांची देयके बाकी असताना ही तोडफोड कारवाई झाल्याने कामगारांनी टिटवाळा पोलिसांकडे धाव घेतली आहे.
एन.आर.सी कारखाना उभा करते वेळेच व्यवस्थापनाने विविध ठिकाणी कामगारांकरिता वसाहती निर्माण केल्या होत्या. गेल्या दहा ते अकरा वर्षांपासून कारखाना बंद पडला असून वसाहतीत राहत असणाऱ्या कामगार वर्गाने वसाहतीत राहण्याला प्राधान्य दिले आहे. आज सकाळी सिक्युरिटीची मोठी फौज घेत एच.एन येथील इमारत क्रमांक सात मध्ये कारवाईचा बडगा उभारत तेरा खोल्यांवर कारवाई केली. राहत असणाऱ्या कामगार वसाहतीत अचानक कारवाई केली गेल्याने कामगार वर्ग संतप्त झाला असून टिटवाळा पोलिसांकडे न्यायाची मागणी केली आहे.
एकीकडे कामगारांच्या थकीत देणी बाबत दिल्ली येथील न्यायालयात कामगार युनियनने याचिका दाखल केली असून त्याचा निर्णय अद्यापही प्रलंबित आहे. पंधरा दिवसापूर्वी कल्याण पश्चिम मध्ये शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी एका बैठकीत कामगारांना न्याय मिळवून देण्याकरिता मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे जाहीर केले होते. पंधरा दिवसाच्या कालावधीतच एन.आर.सी कारखान्यांमध्ये कार्यरत असणाऱ्या शाईन सिक्युरिटी व अदानी सिक्युरिटीच्या सहकार्याने तेरा खोल्यांवर कारवाई करीत कामगारांमध्ये भितीचे वातावरण निर्माण केला असल्याचा आरोप वसाहतीत राहत असणाऱ्या कामगार वर्गाने केला आहे. यासंदर्भात आयटक युनियनचे उपाध्यक्ष उदय चौधरी यांनी या कारवाईला विरोध दर्शविला असून न्यायालयात कामगार वसाहती बाबत 'स्टे' घेतला असल्याचे सांगितले.

Post a Comment