महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची शिक्षणाधिकाऱ्यां बरोबर सहविचार सभा शिक्षकांचे अनेक प्रश्न लागले मार्गी
कल्याण , कुणाल म्हात्रे : शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची शिक्षणाधिकाऱ्यांबरोबर सहविचार सभा नुकतीच संपन्न झाली.
ठाणे जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी कार्यालयात मेडिकल बिल, भविष्य निर्वाह निधी परतावा नापरतावा उचल, भविष्य निर्वाह निधी पावत्या, वरिष्ठ वेतन श्रेणी निवड श्रेणी, शिक्षक ,पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापक मुख्याध्यापक मान्यता, जात-धर्म जन्मतारीख नाव याच्यात बदल, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन, शिक्षकांना दिले जाणारे दुय्यम सेवा पुस्तक, पुरवणी बिले, डीसीपीएस पावत्या, अशा विविध विषयांवर अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी धरणे आंदोलन बाबत जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले होते. त्याची दखल घेत शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांनी शिक्षणाधिकारी कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांची त्यावेळी तातडीने बैठक आयोजित करून अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कोकण विभाग अध्यक्ष रवींद्र इनामदार व ठाणे जिल्ह्यातील पदाधिकारी गुलाबराव पाटील, एकनाथ दळवी , हेमलता मुनोत, संतोष मिसाळ, गजानन भोसले, भाऊसाहेब केदार विजय पाटील जाधव सर यांच्यासमवेत शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांनी शिक्षणाधिकारी कार्यालयात सभा आयोजित करून झालेल्या कामाचा आढावा दिला. शिक्षकांची अनेक प्रश्न निकाली काढत वेतन पथक कार्यालयातील १४१ शिक्षकांची प्रकरणे निकाली काढली असून त्यांच्या खात्यावर रक्कम जमा झालेली आहे.
डीसीपीएस चे काम सुरू असून मनुष्यबळ कमी असल्याने भविष्य निर्वाह निधीच्या पावत्यांना वेळ लागत आहे, तेही काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे वेतन पथक अधीक्षक सुनील सावंत यांना सांगितले. यापुढे संघटना स्तरावर तक्रारी उपलब्ध झाल्या तर आपल्याशी संपर्क करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. सभेला वेतन पथक अधीक्षक सुनील सावंत, कक्षधिकारी चित्रा भारमल व दीपक पाटील, नितीन नगराळे उपस्थित होते. सभेला कल्याण डोंबिवली महानगरचे कार्यवाह गुलाबराव पाटील यांनी प्रास्ताविक करून सुरुवात केली तर ठाणे शहराध्यक्ष हेमलता मुनोत यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Post a Comment