कल्याण डोंबिवलीतील कोळी महिलांना मिळणार मच्छी विक्रीचे परवाने
■विधान परिषद आमदार रमेश पाटील यांनी घेतली आयुक्तांची भेट...
कल्याण , कुणाल म्हात्रे : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील शहर व ग्रामिण भागात राहणाऱ्या कोळी मच्छिमार व मच्छिविक्रेते यांना अनेक समस्या भेडसावत असून त्यांच्या या समस्यांबाबत विधानपरिषदेचे आमदार तथा कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेश पाटील यांनी पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली. पालिका आयुक्तांनी कोळी महिलांना लवकरच मच्छिविक्री परवाने देण्याचे मान्य केले. त्याप्रसंगी कोळी महासंघाच्या शिष्टमंडळामध्ये उपनेते देवानंद भोईर, युवा अध्यक्ष ॲड.चेतन पाटील, माजी नगरसेवक सुभाष बाबडे, सचिव गुरुदेव काळे, अशोक मुरकुटे, सुभाष कोळी, सचिन देशेकर, ॲड.रुपेश पाटील, सचिन कोळी आधी पदाधिकारी उपस्थित होते.
महानगरपालिकेच्या हद्दीत वास्तव्य करणाऱ्या कोळी-आगरी बांधवांचे अनेक वर्षापासुन मच्छिमार व औद्योगिक क्षेत्राच्या संबंधीत अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. प्रामुख्याने मच्छिविक्री करणाऱ्या कोळी महिलांचे मच्छिविक्री परवाने मिळणे, परप्रांतीयांकडुन घरोघरी जाऊन होणारी अनाधिकृत मच्छिविक्री, कल्याण खाडीचे पाणी हे तेथील कंपन्या व कारखान्यामुळे प्रदुषण झाले असल्याने मच्छिमारी व्यवसायावरती विपरित परिणाम होत आहे. कल्याण येथील जुना काळा तलाव हा सन २००२ ते २००८ या दरम्यान सुशोभिकरणाकरीता बंद असलेल्या काळावधीत कर माफ होऊन संबंधित संस्थेला ६ वर्षे पुढील कार्यकाळ देण्याबाबत.
कल्याण-डोबिंवली महानगरपाकिच्या हद्दीतील जाणाऱ्या रिंगरोडमध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना टाऊन प्लानिंगच्या विकासकामांमध्ये सुट मिळण्याबाबत. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील बारावे गावातील गुरचरण जागेवर महानगरपालिकेने राबविलेल्या जलशुध्दीकरण प्रकल्पात स्थानिकांना रोजगार मिळावा आदी विषयांवर आयुक्तांशी चर्चा करण्यात आली.
यावेळी कोळी महिलांना मच्छिविक्री परवाने देण्याबाबत मागणी आयुक्तांनी मान्य केली असून परप्रांतीय मच्छी विक्रेत्यांवर बंदी घालत प्रभाग अधिकाऱ्यांना त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. कंपन्यांकडून खाडीत प्रक्रिया न करता सांडपाणी सोडले जाते यावर संबंधित कंपन्यांना प्रक्रिया करून पाणी सोडण्याच्या सूचना करणार असल्याचे सांगितले. इतरही विषय लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती विधानपरिषद आमदार रमेश पाटील यांनी दिली.

Post a Comment