Header AD

कोव्हिड 19 महामारीच्या 1 वर्षानंतरही रुग्णांना ‘लॉंग कोव्हिड’शी सामना करावा लागतोय - का?

 


मुलुंडच्या फोर्टिस हॉस्पिटलच्या क्रिटिकल केअर विभागाचे संचालक डॉ. राहूल पंडीत यांचा लेख...


जागतिक आरोग्य संघटनेच्या परिस्थितीविषयक अहवालानुसार, नोव्हेल कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या कोव्हिड-19 म्हणजेच कालांतराने सार्स-कोव्ह-2 या नावाने ओळखल्या जाणाऱ्या आजाराचा मानव जातीतला पहिला रुग्ण डिसेंबर 2019 मध्ये चीनच्या वुहान या शहरात नोंदवला गेला. कोव्हिड-19 चा आपल्या जगात प्रवेश होऊन या महिन्यात एक वर्ष पूर्ण होत असल्याने गेल्या 12 महिन्यात 9.74 दशलक्ष भारतीयांना लक्ष्य बनवणाऱ्या या आजाराचे काही आठवडे, काही महिने, नव्हे तर पूर्ण वर्षभर दिसून येणारे दुष्परिणाम आपण समजून घेऊ या. कोव्हिडनंतरच्या या दुष्परिणामांच्या संकल्पनेला लॉंग कोव्हिड असे म्हटले जात असून या संकल्पनेचे रुग्णांच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यावर विपरित परिणाम होत आहेत.


कोव्हिड 19 महामारीच्या काळात, जगभरातच लोकांचे जीव वाचवण्यावर आणि आरोग्य सुधारणेवर भर दिला जात आहे. पण, आता गेल्या काही दिवसांपासून या आजाराचे दीर्घकालीन परिणाम जगाचे लक्ष वेधून घेत असून कोव्हिड-19 मधून बऱ्या झालेल्या रुग्णांवरही या इन्फेक्शनचे दीर्घकालीन दुष्परिणाम दिसून येत आहेत. काही ठराविक रुग्णांनाच या लॉंग कोव्हिडची बाधा होत असल्याने या आजारातून पूर्णतः बरे होण्याच्या शक्यता अद्यापही स्वप्नवतच आहेत का, हा अत्यंत महत्वाचा प्रश्न पुढे येत आहे.


लॉंग कोव्हिडची विशिष्ट व्याख्या सांगणारे पाठ्यपुस्तक अस्तित्वात नसले, तरीही कोव्हिड होऊन गेल्यानंतर सहा महिन्यांपर्यंत त्याची लक्षणे दिसून येणाऱ्या रुग्णांना लॉंग कोव्हिडची लागण झाल्याचे म्हटले जाते. यात केवळ दीर्घकाळ अतिदक्षता विभागात दाखल झालेल्या रुग्णांचाच समावेश नसून ज्या रुग्णांना कोव्हिडची अगदी सूक्ष्म लक्षणे दिसून आली आणि ज्यांना रुग्णालयात भरती होण्याची गरजही भासली नाही, अशा रुग्णांचाही यात समावेश आहे. थकवा येणे, कमी हालचालीनंतरही श्वास घेण्यास त्रास होणे, खोकला, स्नायुदुखी आणि सांधेदुखी, ऐकू कमी येणे, दृष्टीदोष, वास न येणे आणि तोंडाची चव जाणे ही लॉंग कोव्हिडची सर्वसाधारण लक्षणे आहेत. लॉंग कोव्हिड झालेल्या बऱ्याचशा रुग्णांना मानसिक स्वास्थ्यविषयक समस्याही उद्भवल्याचे दिसून आले आहेत. यात तणाव, चीडचीड यापासून डिप्रेशनपर्यंतच्या लक्षणांचा समावेश आहे.


द जर्नल अमेरिकन मेडिकल असोसिएशनतर्फे रोम, इटलीच्या फॉण्डाझिऑन पॉलिक्लिनिको युनिव्हर्सिटॅरिओ अगोस्टिनो जेमिल्ली आयआरसीसीएसने केलेला अभ्यास (143 रुग्णांचा अभ्यास) नुकताच प्रकाशित करण्यात आला. हॉस्पिटलच्या ओपीडीमध्ये आलेल्या कोव्हिडमधून बऱ्या झालेल्या रुग्णांचा यात अभ्यास करण्यात आला होता. या अभ्यासांती असे दिसून आले की, कोव्हिड-19 मधून बऱ्या झालेल्या रुग्णांपैकी 87.4 टक्के रुग्णांमध्ये बरे झाल्यानंतर जवळपास 2 ते 3 महिन्यांपर्यंत आजाराची लक्षणे दिसत होती.


100 टक्के रिकव्हरी होते का, असा प्रश्न अनेकजण विचारतात. पण या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर देता येत नाही. कोव्हिड-19 चे दीर्घकालीन परिणाम समजून घेण्यासाठी जगभर हा अभ्यास आयोजित करण्यात आला असून कोव्हिड-19 नंतर पूर्णतः बरे झालेल्या रुग्णांपैकी बहुतांश रुग्णांना पुन्हा काही लक्षणांना सामोरे जावे लागत आहे, ही काळजीची बाब आहे.


कोव्हिड-19 मधून बऱ्या झालेल्या ज्या रुग्णांना लॉंग कोव्हिडची लक्षणे जाणवत असतील, त्यांच्यासाठी नॅशनल हेल्थ सर्व्हिसतर्फे मार्गदर्शिका प्रकाशित करण्यात आली आहे. त्यांच्या 3 – पी प्लानमुळे पेस (गती) – प्लान (नियोजन) – प्रायोरटाईज (प्राधान्य) या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.


I. पेस (गती) – कोव्हिडमधून बरे झाल्यानंतर किंवा रुग्णालयातून घरी आल्यावर लगेचच तुमच्या पूर्वीच्या रुटीनमध्ये रुळण्याची किंवा पूर्ववत आयुष्याची अपेक्षा करू नका. तुम्ही तुमच्या दैनंदिनीचे नियोजन करताना छोट्याशा विश्रांतीलाही महत्व द्या. दोन कामांमध्ये थोडा ब्रेक घ्या.


II. प्लान (नियोजन) – दैनंदिन कामांची यादी एकत्र पूर्ण करण्याऐवजी आठवड्याभरातल्या कामांचे विभाजन करा. तुमच्या रोजच्या वापरातील वस्तू तुमच्या जवळ राहतील किंवा सहज उपलब्ध असतील, अशाप्रकारे तुम्ही तुमच्या घरातील वस्तुंच्या जागा बदलू शकता.

III. प्रायोरटाईज (प्राधान्य) – तुम्ही स्वतः जी कामे करू शकता आणि ज्या कामात तुम्हाला इतरांची मदत हवी असेल, त्या-त्या कामांचे विभाजन करा. कामांच्या महत्वानुसार त्यांचे प्राधान्यक्रम ठरवा आणि घरातील कामे तुम्ही स्वतः करा आणि बाहेरची कामे कुटुंबातील अन्य व्यक्तींना करायला सांगा.


पुनर्वसन -  लॉंग कोव्हिड झालेल्या बहुतांश रुग्णांना विशेष काळजीची आवश्यकता असते. रुग्णांची पूर्ण क्षमता पुन्हा पूर्ववत होण्यासाठी त्यांना बऱ्याचदा ह्रदयविकार किंवा श्वसनस्वास्थ्यासाठी नियमित व्यायामाची आवश्यकता असते आणि सुधारणा होणे अत्यावश्यक असते. मानसिक आरोग्य सुधारणे आणि ते स्थीर राहणे हाही रिकव्हरीतील एक महत्वाचा भाग असू शकतो.


एकूण सारांश असा की, कोव्हिड रिकव्हरीच्या काळात रुग्णांनी डॉक्टरांच्या सतत संपर्कात राहणे आवश्यक असते. तुमच्यासाठी आवश्यक असलेल्या काही तपासण्या, जीवनशैलीतील बदल किंवा औषधोपचार याविषयी तुमचे डॉक्टर तुम्हाला योग्य तो सल्ला देऊ शकतील. त्यामुळे, डॉक्टरांची भेट घेणे अजिबात चुकवू नका, स्वास्थ्यपूर्ण खा, डॉक्टरी सल्ल्यानुसार औषधे घ्या आणि सकारात्मक विचार करा.


कोव्हिड 19 महामारीच्या 1 वर्षानंतरही रुग्णांना ‘लॉंग कोव्हिड’शी सामना करावा लागतोय - का? कोव्हिड 19 महामारीच्या 1 वर्षानंतरही रुग्णांना ‘लॉंग कोव्हिड’शी सामना करावा लागतोय - का? Reviewed by News1 Marathi on December 16, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

टेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण

  डोंबिवली ( शंकर जाधव )  जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात  टेलगट ट्युमर नावाचा  दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...

Post AD

home ads