ठेवीदारांना ६ कोटींचा गंडा घालणाऱ्या फायनान्स कंपनीची टोळी गजाआड
कल्याण , कुणाल म्हात्रे : ठेवीदारांच्या नावे पर्सनल लोन करून आकर्षक व्याज देण्याचे अमिष दाखवत ४० ठेवीदारांना तब्बल ६ कोटी ४२ लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या एका फायनान्स कंपनीच्या संचालक टोळीला गजाआड करण्यात कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांना यश आले आहे. विशेष म्हणजे आरोपीमध्ये ३ महिलांचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात समोर आले आले आहे.
याप्रकरणी डोंबिवलीच्या सारस्वत कॉलनीतील जय शिवदर्शन सोसायटीत राहणारे अक्षय विलास माने (32) यांनी काही दिवसापूर्वीच बाजारपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. तर हेमलता कांबळी, (वय,५१), तन्मय देशमुख, (वय २७), सुप्रिया गुरव,(वय ३३), वृषाली पवार (वय २९), अभिजित गुरव (वय ३४), मितेश कांबळे (वय, २९) , राहूल कोलगे,(वय २१), असे या भामटयांच्या टोळीतील आरोपींचे नावे आहेत.
कल्याणच्या बैलबाजार येथिल एपीएमसी मार्केटजवळ असलेल्या अरिका अल्टीज् इमारतीच्या तळमजल्यावर 2017 सालात संकल्प फायनान्स नावाने कार्यालय आरोपी प्रशांत कांबळी (मयत), हेमलता कांबळी, तन्मय देशमुख, सुप्रिया गुरव, श्रद्धा मिसळ, मितेश कांबळे, राहूल कोलगे, व इतरांनी मिळून उघडले होते. तेव्हापासून अक्षय माने यांच्यासह ४० ठेवीदारांच्या नावे पर्सनल लोन करून त्या रकमा संकल्प फायनान्समध्ये चेकद्वारे घेऊन त्यावर 1 टक्का व्याज देण्याचे अमिष दाखवले. मात्र अमिष दाखवून पैसे परत न करता कटकारस्थान रचून या सर्व आरोपींनी ४० ठेवीदारांची फसवणूक केली. त्यावेळी याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात भादंवि कलम 406, 420, 120 (ब) सह महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंरक्षण अधिनियम 1999 चे कलम 3 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तक्रारदार अक्षय माने यांचा पगार ४५ हजार रुपये मात्र त्यांना बँकेच्या कर्जाचा हफ्ता १ लाख १७ येत असल्याने हा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. त्यातच विविध बँकेतून ठेवीदारांच्या नावाने लाखोंचे कर्ज काढून भामट्यांच्या टोळीने आपल्या खात्यात रक्कम वळती केली होती. त्यामुळे पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून भामट्यांच्या शोध घेऊन या टोळीला विविध ठिकाणावरून अटक करून त्यांच्या जवळील असलेली चार कोटींची मालमत्ताही जप्त करण्यात आल्याची माहिती डीसीपी विवेक पानसरे यांनी दिली आहे. यावेळी कल्याणचे एसीपी अनिल पोवार, बाजारपेठ पोलीस स्टेशनचे व.पो.नि. यशवंत चव्हाण उपस्थित होते.
Post a Comment