संविधान गौरव दिना निमित्त सर्व समाजातील लोकांना संविधानाची भेट
कल्याण , कुणाल म्हात्रे : सम्राट अशोक तरुण मंडळाच्या वतीने आणि युवा नेते संतोष जाधव आणि संग्राम मोरे यांच्या पुढाकाराने गुरवारी संविधान गौरव दिन साजरा करण्यात आला. यावेळी सर्व समाजातील नागरिकांना संविधानाची प्रत भेट म्हणून देण्यात आली. या कार्यक्रमास न्यायाधीश कळसकर, दलित मित्र अण्णा रोकडे, माजी नगरसेवक अरविंद मोरे, भीमराव डोळस, बाळा बनकर, डिव्ही ओव्हळ, कोरेकर, दादासाहेब निकाळजे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी न्यायाधीश कळसकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना सांगतिले कि, आपल्या देशात नागरिकांना त्यांचे मुलभूत अधिकार, मुलभूत हक्क, मुलभूत कर्तव्य आहेत. देशात कुठेही फिरण्याचा, उद्योग धंदे करण्याचे स्वांतत्र्य आहे. परंतु प्रत्येक अधिकाराला संविधानात मर्यादा आहे. कारण प्रत्येक अधिकाराच्या मागे मर्यादा न घातल्यास अराजकता माजू शकते. संविधानात व्यक्ती स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य असून त्यात देखील मर्यादा आहेत. त्या मर्यादा न पाळल्यास गुन्हा दाखल होतो. कार्यकारी मंडळ, विधीमंडळ, न्याय पालिका हे संविधानाचे महत्त्वाचे अंग असून हे तिन्ही संविधानातील महत्त्वाचे घटक आहेत. संविधानामध्ये हे तिन्ही घटक ताकदवान असून संविधानाने या देशाच्या शेवटच्या घटकापर्यंत न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. संविधान कितीही चांगले असले, पण शासनकर्ते चांगले नसले तर त्या संविधानाचा उपयोग होणार नाही या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वक्तव्याची आठवण न्यायाधीश कळसकर यांनी करून दिली.
संविधान गौरव दिनाचे औचित्य साधून डॉ. गिरीश लटके, डॉ. पुरुषोत्तम टिके, इफ्तेकार खान, अॅड. उदय चौधरी, अशोक सोनटक्के आदींना संविधान देऊन सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशाल शेजवळ, विकास आहिरे, शिवाजी निकम, रोनाल्ड रोजारियो, सागर शिंदे, आकाश साने, बाळा पाटील, अंबादास सोनावणे, संतोष माने, गणेश कांबळे आदि पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

Post a Comment