महासभा, स्थायी समितीच्या सभा वेबिनारऐवजी प्रत्यक्ष सभागृहात होणार भाजपाच्या आंदोलनाला यश
ठाणे, प्रतिनिधी : कोरोना आपत्तीच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेच्या महासभा व स्थायी समितीच्या वेबिनारमार्फत होणाऱ्या सभा यापुढे प्रत्यक्ष सभागृहात घेण्यात येणार आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून भाजपाच्या सातत्याच्या आंदोलनानंतर अखेर वेबिनारऐवजी प्रत्यक्ष सभागृहात सभा घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या निर्णयामुळे भाजपाच्या आंदोलनाला यश मिळाले आहे, अशी माहिती भाजपाचे महापालिकेतील गटनेते संजय वाघुले यांनी दिली.
राज्य सरकारच्या निर्देशानंतर, ठाणे महापालिकेकडून वेबिनारमार्फत महासभा आयोजित केल्या जात होत्या. मात्र, या महासभांमध्ये नगरसेवकांचा आवाज म्यूट केल्याबरोबरच प्रश्न मांडण्याची संधी दिली जात नसल्याच्या तक्रारी होत्या. त्याचबरोबर अधिकाऱ्यांकडून सविस्तर उत्तरे दिली जात नव्हती, याबाबत सर्वप्रथम भाजपाने आवाज उठविला होता. ठाणेकरांचे प्रश्न धसास लागत नसल्यामुळे वेबिनार महासभांचा उपयोग काय, असा सवाल महापालिकेतील गटनेते संजय वाघुले यांच्यासह भाजपाच्या विविध नगरसेवकांनी केला होता. त्याचबरोबर आंदोलनही केले होते. महासभेप्रमाणेच स्थायी समितीच्या सभाही ऑनलाईन होत असल्यामुळे स्थायी समितीतही भाजपाने आक्षेप नोंदविला होता.
आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीवेळी भाजपाचे सदस्य भरत चव्हाण, कृष्णा पाटील आणि नम्रता कोळी यांनी वेबिनार महासभेवर आक्षेप घेऊन सभात्याग केला. कोणत्याही परिस्थितीत प्रत्यक्ष सभा घेण्याची आवश्यकता असल्याचे तिन्ही सदस्यांनी ठामपणे सांगितले. त्यानंतर यापुढील महासभा व स्थायी समितीच्या सभा वेबिनारऐवजी प्रत्यक्ष सभागृहात घेण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. अखेर प्रत्यक्ष महासभा घेण्याच्या भाजपाच्या आंदोलनाला यश आले आहे.

Post a Comment