पत्रीपूल गर्डर लॉन्चींगसाठी केडीएमटी सज्ज नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही परिवहन सभापती मनोज चौधरी
कल्याण , कुणाल म्हात्रे : गेल्या दोन वर्षापासून रखडलेल्या पत्रीपुलाच्या कामातील महत्वाचा टप्पा असलेल्या पत्रीपूल गर्डर लॉन्चींगसाठी कल्याण डोंबिवली महानगर पालिकेची परिवहन सेवा सज्ज झाली असून रेल्वेच्या मेगाब्लॉकदरम्यान नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी परिवहन सेवेच्या २५ बस तैनात असणार असल्याची माहिती परिवहन समिती सभापती मनोज चौधरी यांनी दिली.
कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिमेला जोडणाऱ्या आणि शीळ - कल्याण - भिवंडी रस्त्यावरील वाहतूकीसाठी अतिशय महत्वाच्या असलेल्या पत्रीपूल रेल्वे ओव्हर ब्रिजचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पत्रीपुलाच्या गर्डर लौंचिंगसाठी २१ व २२ नोव्हेंबर रोजी दिवसा प्रत्येकी ४ तास असा एकूण ८ तासांचा पहिला मेगाब्लॉक आणि २७ व २८ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या वेळी प्रत्येकी ३ तास असा ६ तासांचा मेगाब्लॉकला मध्य रेल्वे प्रशासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे. परंतु, या कामा दरम्यान २५० लोकल रेल्वे सेवा रद्द कराव्या लागणार असल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून पर्यायी वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे.
या मेगाब्लॉक दरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन सेवेच्या २५ बस उपलब्ध करण्यात आल्या आहेत. २१ आणि २२ नोव्हेंबर रोजी सकाळी १०:१५ ते दुपारी २:१५ वाजेपर्यंत कल्याण ते डोंबिवली या मार्गावर १० बस, विठ्ठलवाडी ते डोंबिवली मार्गावर ५ बस, कल्याण ते बदलापूर मार्गावर ५ बस तर कल्याण ते टिटवाळा मार्गावर ५ बस धावणार आहेत. तसेच २७ आणि २८ नोव्हेंबर रोजी रात्री २ ते ५ दरम्यान कल्याण ते डोंबिवली मार्गावर ५ बस, कल्याण ते टिटवाळा आणि कल्याण ते बदलापूर मार्गावर प्रत्येकी २ बस धावणार आहेत.
या मेगाब्लॉक दरम्यान नागरिकांच्या सेवेसाठी २५ बस वर २५ चालक, २५ वाहक, ५ अधिकारी, परिवहन व्यवस्थापक, आगार व्यवस्थापक स्वतः उपस्थित राहून या कामगिरीवर लक्ष देणार आहेत. २१ आणि २२ नोव्हेंबर रोजी रेल्वे सेवा बंद असल्याने नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता परिवहन समिती घेणार असून नागरिकांनी परिवहन सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन परिवहन समिती सभापती मनोज चौधरी यांनी केले आहे.

Post a Comment