भिवंडी , प्रतिनिधी : कोरोनाचे संकट आज जरी धूसर झाले असले तरी सार्वजनिक उत्सव, सण दसरा, दिवाळी निमित्त पुन्हा एकदा रुग्ण संख्या वाढू शकते त्यामुळे तालुक्यातील सावद नाका येथे राज्य शासनाच्या जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून उभारण्यात आलेले अद्यावत रुग्णालय भविष्यात ग्रामीण भागातील नागरीकांच्या उपयोगी येणार असल्याचे वक्तव्य जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.ते भिवंडी तालुक्यातील सावद नाका येथे उभारण्यात आलेल्या जिल्हा कोव्हिडं रुग्णालयाच्या पाहणी नंतर पत्रकारांशी बोलत होते .याप्रसंगी हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील ,आमदार शांताराम मोरे ,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ कैलास पवार, नायब तहसीलदार महेश चौधरी यांसह शासकीय अधिकारी उपस्थित होते .
भिवंडी पडघामार्गे कल्याण रस्त्यावरील सावद ग्रामपंचायत क्षेत्रात उभारण्यात आलेले तब्बल 2 लाख 30 हजार चौरस फूट क्षेत्रफळावरील अद्यावत यंत्रणांनी सुसज्य असलेले 818 बेडचे जिल्हा कोव्हिडं रुग्णालय तयार झाले असून सध्या आटोक्यात असणारा कोरोना हिवाळ्यात दुसरी लाट आल्यास त्यावर नियंत्रण आणण्यासाठी शासन स्तरावर योग्य ती खबरदारी घेत सावद येथे रुग्णालय उभारण्यात आले आहे.यामध्ये पुरुष व महिलांकरीता स्वतंत्र प्रत्येकी 360 बेडसह 80 बेडचे अद्यावत आयसीयू कक्ष बनविण्यात आले आहेत.विशेष म्हणजे या रुग्णालयात शौचालयात सुध्दा ऑक्सीजन सुविधा उपलब्ध करण्यात आल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
जिल्ह्यात सध्या कोरोना आटोक्यात आला असला तरी युरोपसह भारतातील काही भागात कोरोना लाट पुन्हा नव्याने पसरत आहे.आपण सर्वांनी योग्य ती खबरदारी घेत कोरोनास आटोक्यात आणले मात्र सणासुदी निमित्त असंख्य नागरिक एकत्रित आल्याने पुन्हा नव्याने कोरोनाची लाट उसळू शकते ही शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरीकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शासन तत्पर असल्याने भविष्याची गरज ओळखून या अद्यावत रुग्णालयाची उभारणी केली आहे. त्यामुळे भविष्यात एकही रुग्ण बेड मिळाला नाही म्हणून उपचारविना राहणार नाही याची काळजी शासन नक्की घेत आहे असे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
Post a Comment