Header AD

ठाण्यात आंदोलना नंतर तीन आमदारांसह भाजपा कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात


वागळे इस्टेटमध्ये वीज बिल होळी आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद..


ठाणे, प्रतिनिधी  :  ऐन लॉकडाऊनमध्ये लादण्यात आलेल्या वीज दरवाढीविरोधात सवलतीला नकार देणाऱ्या महाविकास आघाडी सरकारविरोधात भाजपाने ठाण्यात जोरदार आंदोलन केले. या जोरदार आंदोलनानंतर पोलिसांनी भाजपाच्या तीन आमदारांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. काही वेळानंतर त्यांची सुटका करण्यात आली. दरम्यान, ठाण्यातील १२ ठिकाणी झालेल्या वीज बिल होळी आंदोलनाला भाजपा कार्यकर्त्यांबरोबरच नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


महाविकास आघाडी सरकारने लादलेली अवास्तव वीजबिले वसूल करण्याचे जाहीर करून जनतेचा विश्वासघात केल्याने सरकारला सत्तेच्या धुंदीतून जागे करून जनतेला सवलत देण्यासाठी भाग पाडण्यासाठी भाजपातर्फे आज राज्यभर आंदोलन करण्यात आले. त्यानुसार ठाण्यातील महावितरणच्या वागळे इस्टेट येथील मुख्य कार्यालयाबाहेर आंदोलन झाले.


या आंदोलनात भाजपाचे खासदार विनय सहस्रबुद्धे, आमदार व प्रदेश सरचिटणीस रविंद्र चव्हाण, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, माजी खासदार किरीट सोमय्या, महापालिकेतील गटनेते संजय वाघुले, प्रदेश सचिव संदिप लेले, महिला आघाडीच्या अध्यक्षा मृणाल पेंडसे, मंडल अध्यक्ष सुनील कोळपकर यांच्यासह भाजपाचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. 


महाविकास आघाडी सरकारविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. तसेच वीज बिलाची होळी करण्यात आली. मात्र, आंदोलन संपल्यानंतर पोलिसांनी आमदारांसह सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यांना पोलिसांच्या वाहनांमधून श्री नगर पोलिस ठाण्यात नेण्यात आले. त्यानंतर त्यांची काही वेळानंतर सुटका करण्यात आली.


दरम्यान, कोरोना आपत्तीच्या काळात महाविकास आघाडी सरकारने वीजबिलांच्या वाढीद्वारे सामान्यांवर दुसरी आपत्ती टाकली. सरकारच्या अन्यायकारक निर्णयाविरोधात आवाज उठविल्यावर सवलत देण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, आता सवलत नाकारून जनतेला संकटात टाकण्यात आले, अशी टीका भाजपाच्या नेत्यांनी केली.


राज्यातील समस्यांचे सर्व खापर केंद्र सरकारवर फोडण्याचा रबर स्टॅम्प महाविकास आघाडी सरकारने तयार केला आहे. घरात बसणाऱ्या राज्य सरकारपर्यंत जनतेचा आक्रोश पोचत नाही, अशी टीका खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी केली. 


तर वीज दरवाढीत सवलत न दिल्यास आगामी काळात ठाकरे सरकारची निश्चितच होळी होईल, असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला. अवास्तव बिलांमुळे सामान्य नागरिक त्रासले आहेत. अशा परिस्थितीत सरकारने दखल न घेतल्यास आगामी काळात नागरिकांचा संयम सुटेल, असा इशारा आमदार निरंजन डावखरे यांनी दिला.

ठाण्यात आंदोलना नंतर तीन आमदारांसह भाजपा कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात ठाण्यात आंदोलना नंतर तीन आमदारांसह  भाजपा कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात Reviewed by News1 Marathi on November 23, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

दृष्टीहीनांना चेहरा दाखविणारी दिव्यदृष्टी

  ■यतः सत्यं यतो धर्मो यतो ह्रीरार्जवं यतः।  ततोभवति गोविन्दो यतः कृष्ण्स्ततो जयः अर्थात, जिथे सत्य, धार्मिकता, ईश्वरविरोधी कार्यात अंतःकरणा...

Post AD

home ads