गट शिक्षण आधिकाऱ्यांच्या लेखी पत्रानंतर पालकांचे उपोषण मागे
कल्याण | कुणाल म्हात्रे : पालकांकडून जबरदस्ती फी वसूल करणाऱ्या शाळांच्या विरोधात मी अंबरनाथकर सामाजिक संघटनेच्या वतीने अंबरनाथ तहसीलदार कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरु करण्यात आले होते.गटशिक्षणाधिकारी जतकर यांनी पालकांचे समाधान होईल असे फी वसुली बाबत पत्र दिल्याने पालक आणि विद्यार्थी यांना न्याय मिळवून दिला असून तहसीलदार देशमुख, विस्तार अधिकारी आशिष शेलार, नायब तहसीलदार शेलार, अंबरनाथ पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक संजय धुमाळ यांच्याहस्ते नारळ पाणी देऊन उपोषण मागे घेण्यात आले.
कोरोना महामारीच्या काळात जनतेचे काम धंदे बंद असून कंपन्या बंद झाल्या आहेत, लोकांना कामावरून कमी करण्यात आले आहेत छोटे मोठे व्यवसाय पण बंद आहेत, अशा भितिमय वातावरणामध्ये पालक आपले दैनंदित जीवन जगण्यासाठी जीवाचा आटापिटा करीत असतांना इंग्रजी माध्यमाच्या आणि इतर खाजगी शाळांकडून पालकांना फी भरण्यासाठी तगादा लावत असल्याच्या तक्रारी मी अंबरनाथकर सामाजिक संघटनेकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार आपण शाळेतील फी घेऊ नये असे विनंती पत्र गट-शिक्षणधिकारी व संबंधित शाळांना दिले होते
मात्र तरीही याबाबत समाधानकारक निर्णय न झाल्याने मी अंबरनाथकर आणि इतर प्रमुख सामाजिक संघटनांनी एकत्र मिळून २७ तारखेपासून बेमुदत साखळी उपोषणाला सुरवात केली होती.शाळेने पालकांना फी वसूल करण्यासाठी फोन अथवा एस.एम.एस. करू नये, तसेच मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याची धमकी देऊ नये, शाळेने फी ची जबरदस्ती केली तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा असे लेखी आश्वासन द्यावे. जी शाळा फी ची सक्ती करेल त्या शाळेची मान्यता रद्द कारणाचे आदेश काढण्यात यावे. ज्या पालकांना सक्ती धमकी देऊन कर्ज काढुन फि भरायला लावली त्यांची फी परत मिळावी.
याबाबत संस्थाचालक, विद्यार्थी पालक प्रतिनिधी, पोलिस अधिकारी, शासकीय संबंधित अधिकारी व संघटनेचे प्रमुख प्रतिनिधी, आणि गट शिक्षणाधिकारी यांची एकत्रित मिटिंग घेऊन फी माफी संबधातील ठोस निर्णय घेण्याची मागणी या उपोषणाच्या माध्यमातून करण्यात आली होती. गटशिक्षणाधिकारी जतकर यांनी पालकांचे समाधान होईल असे फी वसुली बाबत पत्र दिल्याने हे उपोषण मागे घेण्यात आले.

Post a Comment