खडकपाडा पोलिसांची नागरिकांना दिवाळीची अनोखी भेट
■हरवलेले २७ मोबाईल केले परत, पुरात हरवलेल्या मोबाईलचा देखील समावेश...
कल्याण , कुणाल म्हात्रे : कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी नागरिकांना दिवाळीची अनोखी भेट दिली आहे. गेल्या २ वर्षात हरवलेले तब्बल २७ मोबाईल नागरिकांना परत केले आहेत. यामुळे या नागरिकांची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड झाली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार खडकपाडा पोलीस ठाणे येथील दाखल हरवलेल्या मोबाईल तक्रारींचा कौशल्यपुर्ण व अथक परिश्रम घेवुन तपास केला असता, सन २०१९ व २०२० मध्ये एकुण २७ मोबाईल सुमारे ४ लाख २५ हजार रूपये किमंतीचे शोधण्याची उल्लेखनीय अशी कामगिरी खडकपाडा पोलीसांनी केलेली आहे. आज धनत्रयोदशीच्या दिवशी पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांच्याहस्ते हे मोबाईल संबंधित नागरिकांना देण्यात आले.
विशेष म्हणजे २०१९ च्या पुरात कल्याण पश्चिमेतील मोहने परिसराजवळील फुलेनगर परिसरातील एका तरुणाचा मोबाईल हरवला होता. पाणी जास्त असल्याने या तरुणाचा तोल गेला आणि त्याच्या हातातील मोबाईल पाण्यात पडून हरवला होता. हा मोबाईल सुद्धा पोलिसांनी शोधून तरुणाची बहीण ऐश्वर्या मोरेच्या स्वाधीन केला आहे.
यापुढेही नागरिकांचे मोबाईल शोधून परत केले जातील, असे पोलिसांनी सांगितले. मात्र, दिवाळीच्या दिवशीच नागरिकांचे हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त करत पोलिसांचे आभार मानले आहेत. तर हि कामगिरी पोलीस उपायुक्त विवके पानसरे, खडकपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुनील पवार, पोलीस कॉन्स्टेबल कुशाल जाधव यांनी केली आहे.
Post a Comment