शिक्षकांची प्रलंबित प्रकरणे निकाली काढावेत अन्यथा धरणे आंदोलन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हाधिकार्यांना निवेदन
कल्याण , कुणाल म्हात्रे : शिक्षकांची प्रलंबित प्रकरणे निकाली काढावेत अन्यथा धरणे आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने ठाणे जिल्हाधिकार्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
ठाणे जिल्हा पूर्वी मोठा होता त्यावेळी संस्था शाळा स्तरावरील अनेक प्रकरणे शिक्षणाधिकारी कार्यालयात प्रलंबित असायचे. ठाणे आणि पालघर जिल्हा विभागणी होऊनही तीच परिस्थिती आहे. शिक्षकांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यावर जमा असलेली रक्कम किती आहे ते शिक्षकांना माहीत नाही. शैक्षणिक वर्ष १४/१५ पासून अनेक शाळांना भविष्य निर्वाह निधीच्या पावत्या मिळालेल्या नाहीत.
घर दुरुस्ती असेल किंवा इतर काही आर्थिक अडचण असेल त्याकरिता प्रस्ताव देऊनही वेळेवर भ.नि नी. ची रक्कम मिळत नाही. अनेक कर्मचारी सेवानिवृत्त होऊनही त्यांचे निवृत्ती वेतन अद्याप सुरू नाही. संस्था, शाळा स्तरावरून शिक्षणाधिकारी कार्यालयात जमा असलेले वेगवेगळ्या विषयांवरचे अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. अनावश्यक त्रुटी काढून किंवा जाणून बुजून प्रकरणे अडवले जातात. शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आपल्या कामासाठी कार्यालयाच्या बाहेर तासंतास थांबावे लागते.
शिक्षकांची हि समस्या लक्षात घेऊन ठाणे जिल्ह्यातील प्रलंबित असलेली प्रकरणे तातडीने निकाली काढून न्याय मिळावा यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कल्याण डोंबिवली महानगर कार्यवाह गुलाबराव पाटील, ठाणे महानगर अध्यक्षा हेमलता मुनोत, महिला आघाडी प्रमुख मनीषा चौहान यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची भेट घेऊन निवेदन दिले. तसेच शिक्षकांचा हा प्रश्न लवकरात लवकर निकाली न निघाल्यास धरणे आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी संघटनेच्या वतीने देण्यात आला.

Post a Comment