केडीएमसीच्या घंटागाडी कर्मचाऱ्यांना मारहाण कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनामुळे शहरात कचऱ्याचे ढीग
कल्याण , कुणाल म्हात्रे : कचरा टाकण्यावरून झालेल्या वादातून झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ केडीएमसीच्या घंटा गाडी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासून 'ब' आणि 'क' वार्डात कचरा उचलण्याचे काम बंद केले आहे. यामुळे शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग साचल्याचे पाहायला मिळाले.
बुधवारी रात्री साडे आठच्या सुमारास बारावे गावातील प्रोसेस प्लँटवर हा प्रकार घडला. स्थानिकांचा विरोध असतानाही संबंधित जागेवर कचरा टाकण्यात आल्याने मारहाणीचा हा प्रकार घडल्याची माहिती कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचे केडीएमसी अध्यक्ष निखिल चव्हाण यांनी दिली. केडीएमसी अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार हे कंत्राटी कर्मचारी संबंधित जागेवर कचरा टाकण्यास गेले होते. केडीएमसी आणि संबंधित जागामालक यांच्यातील हा वाद असून कर्मचाऱ्यांचा त्याच्याशी काहीही संबंध नव्हता. या ५ कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज आम्ही हे कामबंद आंदोलन सुरू केल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.
यामध्ये खासगी कंत्राटदाराचे २२० कर्मचारी सहभागी झाले आहेत. तसेच यासंदर्भात आम्ही केडीएमसी उपयुक्तांची भेट घेऊन कुठे कचरा टाकावा याबाबत लेखी आदेश देण्याची मागणी करणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. दरम्यान या कर्मचार्यांनी कामबंद आंदोलन केल्यामुळे कल्याण पश्चिमेतील विविध ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्याचे पाहायला मिळाले.
तर याप्रकरणी या घंटागाडी कर्मचारी आणि बारावे येथील स्थानिक नागरिकांनी केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांची भेट घेतली. या भेटीत सुनील पवार यांनी या ठिकाणी कचरा न टाकण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या. तर मारहाणी प्रकरणी स्थानिकांना या कर्मचाऱ्यांची माफी मागण्यास सांगितले असता स्थानिक नागरिकांनी माफी मागण्यास नकार दिला. यानंतर सुनील पवार यांनी या कर्मचाऱ्यांना पोलीसात तक्रार दाखल करायची असल्यास करू शकता असे सांगितले. तसेच यापुढे कुठे आणि कधी कचरा टाकायचा आहे हे लेखी स्वरूपात देणार असल्याचे सांगितले.
Post a Comment