ठाण्यात 'जागतिक शौचालय दिन' साजरा; शौचालय जागृती सप्ताहाचा शुभारंभ स्वच्छ सर्वेक्षण २०२०' अभियानात सहभागी होण्याचे नागरिकांना आवाहन

ठाणे , प्रतिनिधी : ठाणे महानगरपालिका व शेल्टर असोसिएटस यांच्या संयुक्त विद्यमाने आज गुरुवार दिनांक १९ नोव्हेंबर २०१९ रोजी 'जागतिक शौचालय दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने शहरातील लोकमान्य नगर परिसरात विविध उपक्रम राबवून नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली. दरम्यान शहरातील वस्तींमध्ये लोकांनी जास्तीत जास्त शौचालये बांधून घ्यावीत यासाठी शौचालय जागृती सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला असून स्वच्छ सर्वेक्षण अभियानांत नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
जागतिक शौचालय दिनानिमित्ताने संयुक्त राष्ट्रसंघातर्फे '१९ नोव्हेंबर' हा दिवस 'जागतिक शौचालय दिन' म्हणून जाहीर केला आहे. जगभर या दिनी स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यात येते. शेल्टर असोसिएटसच्यावतीने गेल्या तीन वर्षांत एकूण २७५० शौचालये ठाणे महानगरपालिकेच्या वस्त्यांमध्ये बांधण्यात आली असून त्यापैकी लोकमान्यनगर ठिकाणी ११०० शौचालये बांधून पूर्ण झालेली आहेत.
जागतिक शौचालय दिन व वस्तींमध्ये लोकांनी जास्तीत जास्त शौचालये बांधून घ्यावीत यासाठी शौचालय जागृती सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. या सप्ताहादरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे, यामध्ये 'शौचालय सजावट स्पर्धा', माझी गल्ली हागणदारीमुक्त गल्ली स्पर्धा, मासिक पाळी व महिलांचे आरोग्य आदी विषयांवर कार्यशाळा', कोरोना योद्धे, शौचालय सफाई कामगारांचा सत्कार अशा विविध उपक्रमांनी शौचालय जागृती सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.
शेल्टर असोसिएटस गेल्या तीन वर्षांपासून ठाणे महानगर पालिकेसोबत सीएसआरच्या माध्यमातून शौचालय बांधण्याचे काम करीत आहे. शेल्टर संस्था वस्तीमधील रहिवाशी व महानगर पालिका या तिघांकडून सहभागी तत्त्वावर शौचालयाचे बांधकाम करीत आहे. यात संस्था शौचालयाला लागणारे सगळे बांधकामाचे साहित्य मोफत देते, वस्तीतील लोक स्वतःकडील पैसे घालून ते शौचालय बांधून घेतात व महानगरपालिकेच्या वतीने ते शौचालय मल:निसारण वाहिनीला जोडून देण्यात येते. या सर्व शौचालयांची नोंद ठाणे महानगरपालिकेच्या स्वच्छ भारत अभियानमध्ये करण्यात येते.
यासोबतच संस्था वस्तीतील नागरिकांकरिता वेगवेगळ्या विषयांवर जनजागृतीपर कार्यक्रम राबवित असते. यामध्ये ओला-सुका कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक आरोग्य, साथीचे रोग तसेच महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या वेगवेगळ्या कल्याणकारी योजनांची माहिती वस्तीतील नागरिकांपर्यत पोहचविण्याचे काम करते.
यावेळी वस्तीतील महिलांना स्वच्छतेचे महत्त्व पटावे व जास्तीत जास्त लोकांनी आपल्या घरात वैयक्तिक शौचालय बांधून घ्यावे यासाठी स्थानिक महिलांना विशेष मार्गदर्शन करण्यात आले. तसेच 'स्वच्छ सर्वेक्षण 2021' अंतर्गत ठाणे शहराला पहिला नंबर मिळवून देण्यासाठी जास्तीजास्त प्रयत्न करावे असे आवाहन संस्थेमार्फत यावेळी करण्यात आले.

Post a Comment