चालत्या मेलमध्ये चढताना घसरलेल्या तरुणाला टीसीच्या प्रसंगावधानामुळे जीवदान कल्याण रेल्वे स्थानकातील घटना
कल्याण ,कुणाल म्हात्रे : मुंबईहून इगतपुरीकडे जाणाऱ्या समस्तीपुर फेस्टिवल स्पेशल या चालत्या मेलमध्ये सामानासह चढण्याच्या प्रयत्नात अर्जुन नावाचा युवक पाय घसरल्याने फलाट आणि मेलच्या मध्ये पडला. मात्र रेलवे टीसी विकी राज यांनी प्रसंगावधान राखत गाडी खाली जात असलेल्या अर्जुनला फलाटावर खेचले इतक्यात आरपीएफ आणि एमएसएफ च्या जवानांसह प्रवाशांनी देखील धाव घेत त्याला वाचवल्याची घटना बुधवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानकातील ४ नंबर फलाटावर घडली.
मुंबई ते इगतपुरी दरम्यान रेल्वेकडून संध्याकाळी ५:३० वाजता फेस्टिवल स्पेशल समस्तीपुर एक्स्प्रेस चालवली जात असून या मेल एक्सप्रेला प्रचंड गर्दी होत आहे. बुधवारी संध्याकाळी साडेपाच वाजता कल्याण स्थानकात हि मेल पोहोचताच प्रवाशांनी गर्दी करत चालत्या मेलमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. महिला सब इन्स्पेक्टर कविता साहू यांनी चालत्या मेलमध्ये चढण्यापासून प्रवाशांना रोखण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान अर्जुन नावाच्या प्रवाशाने सामानासह चालत्या मेलमध्ये चढण्याचा प्रयत्न केला.
मात्र त्याचा हात सुटल्याने तो खाली पडला आणि गाडीखाली घसरला. याचवेळी ड्युटीवर उपस्थित असलेल्या रेल्वे टीसी विकी राज यांनी क्षणात धाव घेत अर्जुन चा हात पकडून त्याला फलाटावर खेचले. तर रेल्वेच्या आरपीएफ आणि एमएसडब्ल्यूचे जवान यांच्यासह प्रवाशांनी घाबरलेल्या अर्जुनला सुरक्षित फलाटावर बसवले. आरपीएफ जवानांनी चालता मेलमध्ये फेकलेले त्याचे सामान देखील काढून त्याच्या ताब्यात दिले. विकी राज आणि रेल्वेच्या स्टाफने दाखवलेल्या प्रसंगावधानाचे कौतुक होत आहे.

Post a Comment