भाजप आमदारांची वीजबिल आंदोलना वरून पोलिसांशी धक्का बुक्की
कल्याण ,कुणाल म्हात्रे : वीजदरवाढीच्यानिषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्या वतीने कल्याण मधील तेजश्री या कार्यालयाबाहेर विजबिलांची होळी करण्यात आली. आमदार गणपत गायकवाड यांच्या नेत्तृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. वीज बिलाची होळी करताना भाजप आमदार गणपत गायकवाड आणि पोलिसांमध्ये जोरदार धक्काबुक्की, झटापट झाली. यावेळी आमदारांनी पोलिसांवर दपडशाहीचा आरोप करत महाविकास आघाडी सरकारचा निषेध केला.
लॉकडाऊनच्या काळात राज्यातील नागरीकांना भरमसाठ वीजबिले आलेली आहेत. लॉकडाऊनमुळे अर्थिक तणावाखाली असलेल्या नागरिकांना महाविकास आघाडीने हा मोठा शॉकच दिला असल्याचा आरोप करत खोटी व वाढीव वीजबिले पाठवून सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडणाऱ्या सरकारच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या आर्थिक होरपळीतून नागरिक सावरले नाहीत. अशा परिस्थितीत आलेली ही भरमसाठ वीजबिले भरणे नागरिकांना केवळ अशक्य आहेत. वीजबिले माफ करावीत याकरिता भाजपाच्या वतीने अनेक वेळा राज्य शासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. तसेच आंदोलनात्मक भूमिका घेतली गेली आहे. परंतु तरी देखील राज्य सरकार नागरिकांकडून जबरदस्तीने वीजबिले वसुली करण्याचा अट्टाहास करत आहे. त्यामुळे हे ठाकरे सरकार गुन्हेगारांचे व दडपशाहीचे असून आमच्यावर दंडूकेशाहीने वागत असल्याचा आरोप यावेळी आमदार गणपत गायकवाड यांनी केला.
यावेळी आमदार गणपत गायकवाड, कल्याण पूर्व मंडळ अध्यक्ष संजय मोरे, कल्याण पश्चिम मंडळ अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, मोहने टिटवाळा मंडल अध्यक्ष शक्तिवान भोईर, महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष रेखा चौधरी व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Post a Comment