अॅग्री टेक स्टार्टअप 'उन्नती'ची १.७ दशलक्ष डॉलरची निधी उभारणी
मुंबई : उन्नती या अॅग्रीटेक स्टार्टअपने नॅबव्हेंचर्स फंड (नाबार्ड)कडून प्री-सीरीज एमध्ये १.७ दशलक्ष डॉलरची निधी उभारणी केली आहे. या निधीचा वापर मंचाचा विकास करण्यासाठी तसेच आणखी भागीदार स्टोअर्स उभारण्यासाठी प्रामुख्याने वापर केला जाईल. पेटीएमचे माजी सीएफओ अमित सिन्हा आणि टाटा टेलिसर्व्हिसचे अनुभवी अशोक प्रसाद यांनी उन्नती या तंत्रज्ञान सक्षम मंचाची उभारणी केली आहे.
या मंचाच्या माध्यमातून शेतक-यांना स्पर्धात्मक किंमतीची माहिती मिळविण्यासह योग्य आणि पारदर्शक पद्धतीने बाजारपेठांमध्ये प्रवेश मिळवून त्यांच्या उत्पादनासाठी किफायतशीर मोबदला मिळण्यासाठी मदत मिळते. तसेच शेतक-यांना विक्रीच्या अनुशंगाने शेती सल्ल्यांसह आर्थिक सेवाही याद्वारे प्रदान केली जाते. पूर्व, मध्य आणि पश्चिम भारतातील कृषीविषयक माहिती आणि उत्पादन खरेदीसाठी उन्नती हे भागीदार दुकानांचे मजबूत नेटवर्क आहे. नव्याने उभारलेल्या निधीतून उन्नती देशातील शेतकरी आणि एफपीओंना सर्वोत्कृष्ट डिजिटल तंत्रज्ञानाचा परिचय देण्यावर लक्ष केंद्रित करेल.
सहसंस्थापक अशोक प्रसाद म्हणाले, “देशातील शेतक-यांना सक्षम बनवणे आणि त्यांची उत्पादकता वाढवण्यासाठी उत्कृष्ट तंत्रज्ञान आणणे, हे उन्नतीचे उद्दिष्ट आहे. शेतीविषयक गरजांची आम्ही पूर्तता करीत आहोत, त्यामुळे सध्याची भांडवली मदत नावीन्यपूर्ण डिजिटल साधनांद्वारे मूल्यस्थिती वाढवण्यास उपयुक्त ठरेल. नॅबव्हेंचर्स (नाबार्ड)शी भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. या निधीनंतर आता आम्ही भविष्याच्या दृष्टीकोनातून नवे आणि महत्त्वाचे टप्पे गाठण्यासाठी उत्सुक आहोत."

Post a Comment