आधीच केडीएमसीत खड्डेमय रस्ते, त्यात पोकलेनने उकरला रस्ता भाजप नगरसेवकाच्या कामासाठी पोकलेनचा वापर
कल्याण | कुणाल म्हात्रे : कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रातील रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे असतांना त्यातच आता पोकलेनने रस्ता उकरला असल्याचा प्रकार समोर आला आहे. कल्याण पूर्वेतील ड प्रभाग अंतर्गत खडेगोळवली येथे नगरसेवक तथा बिल्डर मनोज राय यांच्या बिल्डिंगच्या साईडवर कामासाठी आलेली पोकलन मशीन खडेगोळवली ते अपर्णा डेअरी पर्यंत रस्त्यावरुन चालवत घेऊन गेल्यामुळे रस्त्यावर सर्वत्र खड्डे पडले आहेत. तसेच काही जागेवर पाण्याची पाईप लाईन देखील तुटली असल्याचा आरोप राष्ट्र कल्याण पार्टीने केला आहे. पोकलन मशीन ही रस्त्यावर चालवण्यास परवानगी नसताना देखील सदर पोकलन मशीन १ किलोमिटर इतक्या अंतरच्या आस पास रस्त्यावरुन चालवण्यात आली. या प्रकरणाचा राष्ट्र कल्याण पार्टीने विरोध करत नगरसेवक तथा बिल्डर मनोज राय व पोकलन मशीन मालक यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करुन नुकसान झालेल्या रस्त्याची भरपाई करण्याची मागणी कल्याण,डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडेकेली.
यानंतर ‘ड’ प्रभाग अधिकारी वसंत भोंगाडे यांनी या रस्त्याची पाहणी केली तसेच पालिकेच्या तांत्रिक विभागाला कळविण्यात आले असून तपास करुन योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी राष्ट्र कल्याण पार्टीचे अध्यक्ष शैलेश तिवारी, महासचिव राहुल काटकर, जिल्हाध्यक्ष हर्षल साळवी, अनुपम त्रिपाठी, सचिन तिवारी, प्रविन के.सी., संजय यादव, पवन दुबे आणि पदाधिकारी उपस्थित होते.दरम्यान एकीकडे महानगरपालिका रस्ते दुरुस्ती साठी कोट्यावधीचा निधी खर्च करत असतांना अशा प्रकारे निष्काळजीपणामुळे चांगले रस्ते खराब होत असल्याने नागरिकांनी कर रूपाने भरलेल्या पैशाचा चुराडा होत असल्याने नागरिकांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे.

Post a Comment