आडीवली व ढोकली येथे ५२ वीज चोरांविरुद्ध कारवाई बिल्डर कडून बनावट मीटरद्वारे सदनिका धारकांना वीज
कल्याण | कुणाल म्हात्रे : महावितरणच्या कल्याण पूर्व विभागातील उपविभाग एक अंतर्गत मंगळवार व बुधवारी तब्बल ५२ वीज चोरांविरुद्ध धडक कारवाई करण्यात आली. आडीवली व ढोकली येथील 'गॅलेक्सि रेसिडेन्सी' आणि 'द इम्पिरियल' सोसायट्यांमधील दहा इमारतींमध्ये झालेल्या कारवाईत बिल्डरकडून बनावट मीटरद्वारे तसेच कांही ठिकाणी मीटरशिवाय सदनिकाधारकांना थेट वीजपुरवठा केल्याचे आढळून आले. नागरिकांनी महावितरणचे संकेतस्थळ, मोबाईल अँप या ऑनलाईन सुविधेचा वापर किंवा नजीकच्या महावितरण कार्यालयात स्वतः अर्ज करून सुलभ प्रक्रियेतून अधिकृत वीजजोडणी घ्यावी व विजेचा वापर करावा असे आवाहन कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांनी केले आहे.
कल्याण पूर्व उपविभाग एकचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता जितेंद्र प्रजापती यांच्या नेतृत्वाखाली आडीवली व ढोकली येथील 'गॅलेक्सि रेसिडेन्सी' व 'द इम्पिरियल' सोसायट्यांमधील ३६० सदनिकांच्या वीज पुरवठ्याची तपासणी करण्यात आली. यात ५२ ठिकाणी विजेचा अनधिकृत व चोरटा वापर होत असल्याचे निदर्शनास आले. या वीज चोरट्यांनी जवळपास ८ लाख २० हजार किंमतीची ८२ हजार युनिट वीज चोरून वापरल्याचे निष्पन्न झाले.
चोरून वापरलेल्या विजेचे देयक दंडासह भरण्याच्या नोटीसा संबंधितांना देण्यात येत आहेत. त्यानुसार देयक व दंडाचा भरणा न करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाईसाठी फिर्याद देण्यात येईल. या कारवाईत बिल्डरच्या माध्यमातून बनावट मीटरद्वारे पाच ठिकणी तर इतर ठिकाणी विजेचा थेट चोरटा वापर आढळून आला. वीज चोरांविरुद्धची मोहीम नियमितपणे सुरु राहणार असून कारवाई टाळण्यासाठी अधिकृत वीजजोडणी घेऊनच विजेचा वापर करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.

Post a Comment