हाजूरी येथील कोव्हीड वॅार रूमला महापालिका आयुक्तांची भेट रूग्णांच्या तक्रारींचे तात्काळ निवारण करण्याचे दिले आदेश
ठाणे | प्रतिनिधी : कोव्हीड 19 चा सामना करण्यासाठी शहरात प्रभावी उपाययोजना सुरु असून कोव्हीड 19 च्या अनुषंगाने आवश्यक आणि मुलभूत माहिती आणि सूचना देण्यासाठी हाजूरी येथील इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर येथे सुरू करण्यात आलेल्या कोव्हीड वॅार रूमला आज महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी भेट देवून रूग्णांच्या तक्रारींचे तात्काळ निवारण करण्याचे आदेश दिले.
यापूर्वी नागरिकांना कोव्हीडविषयी योग्य माहिती मिळावी यासाठी ठाणे महानगरपालिकेच्यावतीने महापालिकेच्या तिस-या मजल्यावर वॅार रूम कार्यान्वित करण्यात आली होती परंतु सदरची वॅार रूम अद्यावत व प्रशस्थ जागेत असावी या करिता सदरची वॅार रूम हाजूरी येथे स्तलांतरित करण्यात आली आहे. या अद्यावत वॅार रूमला आज महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी भेट देऊन यंत्रणेची माहिती घेतली.
या वॅार रूमच्या माध्यमातून नागरिकांकडून येणाऱ्या सर्व तक्रारींचे समाधानकारक निराकरण करणे, तक्रारीच्या अनुषंगाने महापलिकेच्या संबंधित विभागाशी अथवा शासनाच्या संबंधित विभागांशी समन्वय ठेवणे, मंत्रालय कोव्हीड 19 वॅार रूमशी समन्वय ठेवणे, कोरोना बाधित रूग्णांना आवश्यकता पडल्यास रूग्णालयांमध्ये दाखल होण्यासाठी मार्गदर्शन करणे, रूग्णवाहिका, शववाहिका उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने समन्वय ठेवणे आदी कामे करण्यात येत आहेत. या वॅाररूमध्ये 24 तास अधिकाऱी आणि डॅाक्टारांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळी रूग्णांच्या तक्रारींना प्राधान्य देण्यात यावे अशा सूचना त्यांनी वॅार रूममधील डाॅक्टर्स आणि अधिकारी यांना दिल्या. यावेळी उप आयुक्त संदीप माळवी, अशोक बुरपल्ले, माहिती व जनसंपर्क अधिकारी महेश राजदेरकर, कार्यकारी अभियंता शुभांगी केसवानी, वैद्यकीय अधिकारी डॉ. खुशबू टावरे आदी उपस्थित होते.

Post a Comment