भात शेतीच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत खासदार कपिल पाटील
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकामुळे शेतकऱ्यांना होणारे फायदे व विरोधी पक्षांनी निर्माण केलेले गैरसमज दूर करण्यासाठी खासदार कपिल पाटील यांच्याकडून शेतकऱ्यांचा संवाद साधला जात आहे. त्यानुसार भिवंडी ग्रामीण भागातील भोकरी, डोहोळे आणि कुंभारशिव गावातील शेतकऱ्यांना माहिती दिली. त्याचबरोबर करपा रोग व मुसळधार पावसात जमीनदोस्त झालेल्या भातपिकाचीही पाहणी केली.
भिवंडी लोकसभा क्षेत्रातील ग्रामीण भागात भात हे मुख्य उत्पन्न आहे. सध्या भातपिक काढणीला आले असतानाच, करपा रोग पडल्यामुळे अनेक भागातील भातपिक जमीनदोस्त झाले आहे. नुकसान झालेल्या पिकाचे तातडीने पंचनामे करावेत, अशी मागणी खासदार कपिल पाटील यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे केली आहे. भिवंडी, कल्याण, वाडा, शहापूर आणि मुरबाड तालुक्यातील तहसिलदारांशीही संपर्क साधून खासदार पाटील यांनी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीकडे लक्ष वेधले.
कृषी विधेयकामुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. प्रत्येक शेतकऱ्याला आपले पिक कोठेही विक्री करण्याची संधी मिळणार आहे. सध्याच्या बाजार समितीचाही पर्याय शेतकऱ्यांपुढे आहे. नव्या विधेयकांमुळे दर्जेदार पिक व भाजीपाल्याला बाजारभावापेक्षा जास्त भाव मिळेल, अशी माहिती खासदार कपिल पाटील यांनी शेतकऱ्यांना दिली. या वेळी शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या शंकांचेही त्यांनी निरसन केले.
भात शेतीच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत खासदार कपिल पाटील
Reviewed by News1 Marathi
on
October 04, 2020
Rating:

Post a Comment