Header AD

कुर्मगती फलंदाजी चेन्नईला भोवली
डॉ. अनिल पावशेकर....


*************************************************


अबुधाबीला खेळल्या गेलेल्या चेन्नई विरूद्ध कोलकाता सामन्यात डेथ ओव्हरमध्ये चेन्नईच्या फलंदाजांची कासवछाप फलंदाजी संघाच्या मुळावर येऊन त्यांना अवघ्या १० धावांनी मात खावी लागली. जिंकण्यासाठी १६८ धावांचा पाठलाग करताना एकवेळ १२ व्या षटकात १०० धावा फळ्यावर लागल्या होत्या. मात्र शेन वॉटसन बाद होताच सामन्याचे चित्र पालटले आणि ४२ चेंडूत ६८ धावांसाठी चेन्नई संघाला धाप लागताच त्यांना हातातोंडाशी आलेला विजय गमवावा लागला. धोनी, सॅम करन, केदार जाधव आणि रविंद्र जडेजा धावगतीला शरण गेले आणि *हक्काचा विजय कोलकाता संघाला बहाल केला.*


पाठलाग करताना होणारी तारांबळ लक्षात घेऊन दिनेश कार्तिकने प्रथम फलंदाजी घेतली. यावेळी त्याने मागच्या सामन्यात धुवांधार फलंदाजी करणाऱ्या राहुल त्रिपाठीला सलामीला धाडले आणि त्यानेही कर्णधाराचा विश्र्वास सार्थ ठरवत ५१ चेंडूत ८१ धावांची धडाकेबाज खेळी केली. दुसरा सलामीवीर शुभमन गिल यावेळी फारसा प्रभाव दाखवू शकला नाही. शार्दुल ठाकूरने पुन्हा एकदा चतुराईने गोलंदाजी करत त्याला फसवले. तर नितिश राणाला करन शर्माने परत पाठवले. गोलंदाज फलंदाजांवर भारी ठरताच कार्तिकने पिंच हिटर म्हणून सुनील नरेनला मैदानात सोडले आणि त्याने ९ चेंडूत १७ धावा करत *खेळपट्टीवरील मरगळ थोडी कमी केली*.


११ व्या षटकात संघाच्या ९८ धावा असताना नरेन बाद झाला आणि कोलकाता संघाचा सर्वोत्तम फलंदाज मॉर्गन राहुल त्रिपाठीच्या साथीला आला. एका टोकाला राहुलने बळी जात असतांनाही आपली फटकेबाजी सुरू ठेवल्याने कोलकाता संघ दोनशेच्या आसपास पोहचतील अशी आशा होती परंतु मॉर्गन  आणि रसेल,, सपशेल अपयशी ठरताच हा संघ माघारला. त्यातच अनुभवी ब्राव्होने चतुराईने राहुलसहीत ३ बळी टिपताच *कोलकाता संघ १६७ धावांत कोसळला.* पहिल्या दहा षटकात स्वैर झालेल्या चेन्नई गोलंदाजांनी उरलेल्या १० षटकात घरवापसी करत ८ बळी घेतले आणि कोलकाता संघाला १६७ धावांवर रोखले.


चेन्नई संघाने मागचा सामना दहा गड्यांनी जिंकल्याने ते या सामन्यात सुद्धा यशस्वी पाठलाग करतील अशी अपेक्षा होती. शिवाय वाटसन, ड्युप्लेसी, राडडूचा धडाडा पाहता १६८ धावा अशक्यप्राय लक्ष्य नव्हतेच. *मात्र कुठे माशी शिंकली कोण जाणे.* वाटसन ज्या सहजतेने चेन्नई गोलंदाजांना पिटाळत होता ते पाहता धोनीला हातात बॅट पकडावी लागणार नाही अशी चिन्हे दिसत होती. सोबतच कोलकाता संघाचा प्रमुख गोलंदाज पॅट कमीन्स घातक दिसत नव्हता. मात्र सुनील नरेनच्या भानामतीत वाटसनची वाट लागली आणि पायचित होत तो तंबूत परतला. आता पिचवर धोनी, सॅम करनसह उपस्थित होता परंतु विस षटके यष्टीरक्षणात उठाबशा काढलेला माही थकलेला, दमलेला, भागलेला आणि सुस्तावलेला दिसत होता. त्याला चौथ्या क्रमांकावर *धरून बांधून गोसावी* केल्यासारखे पाठवले असे दिसत होते.


वाढते वय, स्थुलता आणि सततच्या दगदगीतही माही *यष्टीरक्षणात अजुनही कमाल दाखवत असला तरी फलंदाजीत तो किमान रूपात दिसत आहे.* अखेर धोनीची धडपड फार काळ चालली नाही अत्यंत वाईट पद्धतीने तो बाद झाला. धोनीमधला फिनीशर फिनीश होत असल्याची त्याची खेळी ग्वाही देत आहे. यावेळी खरेतर डेरेन ब्राव्हो सारख्या ब्रेव्ह फलंदाजाने येणे अपेक्षित होते. मात्र सतत अपयशी ठरलेला आणि अजिबात फॉर्मात नसलेल्या केदार जाधवने मोर्चा सांभाळताच चेन्नई पाठीराखे जीव मुठीत धरून बसले.


केदार जाधवने १२ चेंडूत ७ धावा करत चेन्नईच्या आशा आकांक्षांना मुठमाती दिली. केदारची सध्याची फलंदाजी पाहता पिवळा ड्रेस घालून ग्राउंड्समन जरी फलंदाजीला उतरला तरी तो केदारपेक्षा जास्त धावा काढण्याची शक्यता दिसते. फलंदाजीत केदारची अशीच प्रगती राहीली तर चेन्नई संघाचे दार त्याच्यासाठी कधीही बंद होऊ शकते. एका टोकाला जडेजा बॅटरूपी दांडपट्टा फिरवत असताना केदार ढिम्मपणे खेळपट्टीवर उभा होता. कदाचित त्याला आमीरच्या गजनीमधील स्मृतीभ्रंशाची लागण झाली असावी. बॅट गोलंदाजांवर तुटून पडायसाठी असते याचा त्याला विसर पडलेला दिसतो. धोनी, केदारचे फलंदाजीतलेअपयश म्हणजे चेन्नई संघाला *कुर्हाडीचा दांडा गोतास काळ* असल्यासारखे आहे.


खेळ म्हटले की जयपराजय ठरलेच आहे. मात्र झालेल्या चुकांतून योग्य बोध घेतला तर ते संघासाठी उर्जा देणारे ठरते. कार्तिकने सलामीला केलेला बदल, मध्यफळीची पुनर्रचना, गोलंदाजांना हाताळताना दाखवलेली प्रगल्भता त्याच्या संघाला विजय देऊन गेली. तर चेन्नई संघाने उत्तम गोलंदाजी करूनही फलंदाजांच्या ढिसाळ कामगिरीने त्या संघाचे वाटोळे झाले. *धोनी आणि केदार चेन्नई संघाचे संताजी धनाजी आहेत*. या दोघांकडून चेन्नई संघाला बऱ्याच अपेक्षा आहे. हे दोघेही जितक्या लवकर आपल्या मुळ रुपात येईल तितके चेन्नईचे विजयरोपटे खेळपट्टीवर फोफावत जाईल. अन्यथा चेन्नई संघावर *नाव मोठे लक्षण खोटे* चा शिक्का बसायला वेळ लागणार नाही.


***********************************************

दि. ०८ ऑक्टोबर २०२०

डॉ अनिल पावशेकर

anilpawshekar159@gmail.com

++++++++++++++++++++++++++++++++++++

कुर्मगती फलंदाजी चेन्नईला भोवली कुर्मगती फलंदाजी चेन्नईला भोवली Reviewed by News1 Marathi on October 08, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कोव्हिड-१९ पीडितांसाठी एमजीच्या ग्राहकांनी उभारला निधी

■ बायोडिग्रेडेबल बेडशीट केल्या दान; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले उपक्रमाचे कौतुक ..   महाराष्ट्र, १८ मे २०२१ :  एमजी मोटर इंडियाने पुण...

Post AD

home ads