ऑनलाईन परीक्षांमध्ये सुधारणा करून विद्यार्थ्यांचा मानसिक छळ थांबवा राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसची राज्यपालांकडे मागणी
कल्याण | कुणाल म्हात्रे : सर्वोच्य न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार विद्यापीठाअंतर्गत महाविद्यालयांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने सुरु आहेत. मात्र या परीक्षा सुरु असताना विद्यार्थ्यांना असंख्य प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. या अनुषंगाने परीक्षा पद्धतीतील त्रुटीमध्ये सुधारणा करून विद्यार्थ्याचा मानसिक छळ थांबविण्याची मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसने राज्यपालांकडे केली आहे. याबाबतचे निवेदन राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रसाद महाजन यांनी तहसीलदार कार्यालयात दिले आहे.
ऑनलाईन परिक्षांमध्ये नियोजनशुन्यता, मॉक टेस्टचा अभाव, कुशल मनुष्यबळाचा अभाव, अपात्रताधारक सर्विस प्रोव्हायडर, हेल्पलाईन केंद्राची अकार्यक्षमता व प्रशासकीय दिरंगाई, एमसीक़्यु प्रश्नांची प्रश्नपेढी न पुरवणे यामुळे विद्यार्थी त्रस्त आहेत. ऑनलाईन परिक्षेत प्रश्न कसे असतील याची माहिती नसल्याने विद्यार्थ्यांना ताण येत आहे. डिव्हाईसचा व कनेक्टिव्हीटीचा अभाव व त्यावर मात केली की ऑनलाईन पेपरचे लॉगइन होत नाही, लॉगइन झाले की पेपर येत नाही आणि पेपर आलाच तर तो सबमिट होत नाही असे एक ना अनेक समस्या विद्यार्थ्यांना येत आहे.
या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी विद्यापीठ प्रशासन सक्षम आहे असे वाटत नसल्याने राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस विद्यापीठाच्या नियोजनशून्य कारभाराचा व ढिसाळपणाचा जाहीर निषेध करत असून यापुढेही परीक्षा अश्याच पध्दतीने सुरू राहिल्यास विद्यापीठासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रसाद महाजन यांनी दिला आहे.
यावेळी जिल्हा अध्यक्ष प्रसाद महाजन, जिल्हा उपाध्यक्ष हेमंत मिरकुटे, जिल्हा सरचिटणीस रोहण साळवे, डोंबिवली विधानसभा अध्यक्ष केतन जगताप, कल्याण प.विधानसभा अध्यक्ष कुणाल भंडारी, कल्याण ग्रामिण विधानसभा अध्यक्ष नितेश पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment