कल्याण-शीळ रोडवरील वाहतूक सोडवण्यासाठी मनसेचा पुढाकार
■आठवडाभर चालवणार वाहतूक सौजन्य सप्ताह वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मनसेचे वॉर्डर सैनिक तैनात...
डोंबिवली | शंकर जाधव : कल्याण शीळ रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मनसेने ‘इच्छा तिथे मार्ग’ हे घोषवाक्य घेत २८ ऑक्टोबरपासून ‘वाहतूक सौजन्य सप्ताह’ सुरु केला आहे. या आठवड्याभरात मनसेने नेमलेले ३० वॉर्डन कल्याण शीळ रस्त्यावरील वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचे काम पार पाडणार आहेत. सत्ताधाऱ्यांकडून काही उपाययोजना केली जात नसल्याने मनसेने ‘इच्छा तिथे मार्ग’ हे घोषवाक्य घेऊन वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी स्वत:हून पुढाकार घेतला आहे.
कल्याण शीळ रस्त्यावर वाहतूक कोंडीमुळे प्रवासी चार ते पाच तास अडकून राहतात. रेल्वे सेवा बंद असल्याने रस्ते वाहतुकीवर मोठा ताण आला आहे. अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली या भागातून हजारो चाकरमानी ठाणे, नवी मुंबई, मुंबईला कामाला जातात. त्यांचा जास्त वेळ हा शीळ रस्त्यावर वाहतूक कोंडीतच जातो.कल्याण शीळ रस्त्याचे सहा पदरी काँक्रिटीकरण सुरु आहे. या कामाच्या कंत्राटदाराकडून सुरक्षिततेचे योग्य नियम पाळले जात नाहीत.
त्याचा प्रवासी आणि वाहन चालकांना मोठा फटका बसत आहे. कल्याण शीळ रस्त्यावरील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी मनसेचे आमदार राजू पाटील हे स्वत:हून रस्त्यावर उतरले होते. त्यांनी वाहतूक कोंडी प्रकरणी वाहतूक पोलिसांना चांगले फैलावर घेतले होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांच्या मनुष्यबळ कमी आहे, वॉर्डनची संख्या कमी आहे, मागणी करुन ही वॉर्डन मिळत नाही, अशी अडचण पोलिसांनी सांगितली होती.कल्याण शीळ रस्त्यावर अवजड वाहनांना पोलीस वाहन चालकाकडून पैसे घेऊन सोडतात.
त्यामुळेही वाहतूक कोंडीत भर पडते. या घटनेचा पर्दापाश करण्यासाठी मनसेने एका गाडीचा पाठलाग करुन चालकाकडून हे सत्य वदवून घेतले होते. त्याचा व्हिडीओ मनसेने सोशल मीडियावर व्हायरल केला होता.पोलिसांकडे मनुष्यबळाची कमतरता पाहता मनसेने वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मनसेचे या रस्त्यावर आजपासून ‘वाहतूक सौजन्य सप्ताह’ सुरु केला आहे. या सप्ताहात मनसेच्या वतीने ३० वॉर्डन `शीळ ते पलावा` दरम्यान वाहतूक सुरळीत करण्याचे काम करतील. संदीप ( रमा ) म्हात्रे , चिन्मय मडके यांसह अनेक मनसे वॉर्डन सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत वाहतूक सुरळीत करण्याचे काम करणार असल्याचे मनसेचे पदाधिकारी यांनी सांगितले.

Post a Comment