कल्याणातील १५६ वर्षे जुने 'सार्वजनिक वाचनालय' पुन्हा सुरु
कल्याण | कुणाल म्हात्रे : ऐतिहासिक कल्याण शहराची आणखी एक ओळख असणारे १५६ वर्षे जुने 'सार्वजनिक वाचनालय' आजपासून पुन्हा वाचकांच्या सेवेमध्ये रुजू झालेआहे. ग्रंथालय सुरू करण्याबाबत राज्य सरकारने काल दिलेल्या निर्णयानंतर एका छोटेखानी कार्यक्रमाद्वारे कल्याणचा ऐतिहासिक 'पुस्तक खजिना' वाचकप्रेमींसाठी खुला करण्यात आला.कोरोना आणि त्यापाठोपाठ आलेल्या लॉकडाऊनमूळे तब्बल ६ महिने कल्याणचे हे सार्वजनिक वाचनालय बंद होते. गेल्या १५६ वर्षांच्या काळात पहिल्यांदाच इतक्या दिर्घ कालावधीसाठी बंद होते. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेची ८० हजारांहून अधिक विविध विषयांवरील पुस्तकांचा ठेवा कल्याण सार्वजनिक वाचनालयाकडे आहे. तर ३ हजार पुस्तकप्रेमी त्याचे सभासद आहेत. देशाचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून हे सार्वजनिक पुन्हा सुरू करण्यात आले. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे आणि निवडक जुन्या सभासदांच्या उपस्थितीत आजपासून हे वाचनालय सुरू झाले.
वाचकांच्या इच्छाशक्तीमूळे आज वाचनालये पुन्हा सुरू होत असून त्यामुळे इथली पुस्तकं पुन्हा जिवंत होणार असल्याची प्रतिक्रिया वाचनालयाचे अध्यक्ष राजीव जोशी यांनी दिली. तसेच वाचनालय सुरू होत असले तर अडचणी अनंत आहेत. शून्य उत्पन्नाच्या पार्श्वभूमीवर हे वाचनालय सुरू ठेवणे आव्हान असल्याचेही जोशी यावेळी म्हणाले. तसेच शासनाच्या संपूर्ण नियमावलीनुसारच वाचनालयाचे व्यवस्थापन सुरू राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान कल्याण सार्वजनिक वाचनालयाचे सरचिटणीस भिकू बारसकर यांच्यासह राज्यातील प्रमुख वाचनालयांच्या विश्वस्तांनी काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती.
Post a Comment