हाथरस घटनेच्या निषेधार्थ कल्याण मध्ये कॅण्डल मार्च
कल्याण | कुणाल म्हात्रे : उत्तर प्रदेश मधील हाथरस जिल्ह्यात चंदपा पोलीस स्टेशन हद्दीत चार तरुणांनी मागासवर्गीय मुलीवर बलात्कार करून तिचे हाल करण्यात आले. तिचे हाड तोडून तिची जीभही कापण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ कल्याण मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने कॅण्डल मार्च काढून निषेध नोंदविण्यात आला.
कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून या कॅण्डल मार्च ला सुरवात होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात या पिडीत मुलीला श्रद्धांजली वाहण्यात आली. कित्येक वर्षे महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडत असून हे सत्र कधी थांबेल असा सवाल महिला विचारत आहेत. अत्यंत क्रूरपणे या मुलीला मारण्यात आलं. मुलीच्या मृत्युनंतर मृतदेह कुटुंबाला न देता पोलिसांनीच या मुलीवर अंत्यसंस्कार केल्याने युपी सरकार आरोपींच्यापाठीशी असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा सारिका गायकवाड यांनी केला असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
या कॅण्डलमार्च मध्ये महिला जिल्हाध्यक्षा सारिका गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष वल्ली राजन, मीनाक्षी आहिरे, रेखा सोनावणे, अजया श्याम आवारे, बाबा रामटेके, मनोज नायर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
Post a Comment