Header AD

नाईट रायडर्सचा पंजाबवर थरारक विजयडॉ. अनिल पावशेकर.....


अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर रंगलेल्या थरारक नाट्यात नाईट रायडर्स कोलकाताने टिच्चून गोलंदाजी करत किंग्ज इलेव्हन पंजाबवर अवघ्या दोन धावांनी मात केलेली आहे. शेवटच्या षटकात १४ धावांचे आव्हान पंजाबचा संघ पेलू शकला नाही आणि पुन्हा एकदा शेवटच्या षटकात पराभूत व्हायची नामुष्की पंजाब संघाने ओढवून घेतली आहे. ग्लेन मॅक्सवेल सारखा स्फोटक फलंदाज मैदानात असुनही शेवटच्या चेंडूवर तो षटकार ठोकू शकला नाही आणि हातातोंडाशी आलेला विजय त्यांना कोलकाता संघाला बहाल करावा लागला. जवळपास संपूर्ण सामना चांगल्या प्रकारे खेळून पुण्य जमा केलेल्या पंजाब संघाची अवस्था *काशीवरून आणलं आणि वेशीवर सांडलं* अशी झाली आहे.


दिनेश कार्तिकने नाणेफेक जिंकून चतुराईने पहिले फलंदाजी निवडली मात्र त्याला पहिल्या ४ षटकातच १४ धावांत दोन गडी गमवावे लागले. सलामीवीर शुभमन गिल आणि अनुभवी मॉर्गनने ११ व्या षटकापर्यंत संघाला साठी गाठून दिली. मात्र मॉर्गन या सामन्यात बहरलाच नाही. तर दुसरीकडे कोलकाता संघाचे ओझे इमानेइतबारे वाहणाऱ्या शुभमन गिलने इथेही आपला जलवा दाखवत अर्धशतक झळकावले. खतरनाक आंद्रे रसेलच्या बॅटने या सामन्यातही त्याच्याशी असहकार आंदोलन केल्याने कोलकाता संघाच्या चिंतेत भर पडली होती. मात्र संकटमोचक कर्णधार दिनेश कार्तिकने आपली जबाबदारी ओळखत २९ चेंडूत घणाघाती ५८ धावा चोपून काढल्या आणि आपल्या संघाला १६४ पर्यंत नेण्यात तो यशस्वी ठरला.


या सामन्यात किंग ठरण्यासाठी पंजाबला १२० चेंडूत १६५ धावा करायच्या होत्या आणि मयंक, राहुल जोडी याकरीता सज्ज होती. या जोडीने सहजसुंदर फलंदाजी करत कोलकाता गोलंदाजांचा नेटाने सामना केला तसेच शतकी सलामी सुद्धा दिली. हीच जोडी पंजाबची तारणहार ठरणार असे वाटत असतानाच १५ व्या षटकांत मयंकची खेळी संपुष्टात आली आणि इथेच पंजाबची पिछेहाट सुरू झाली. खरेतर या हंगामात त्यांनी दिल्ली विरूद्ध अटीतटीच्या सामन्यात निसटता पराभव स्विकारला असल्याने यावेळी विशेष काळजी घ्यायला हवी होती. मात्र विश्वासू निकोलस पुरम सोबतच नवोदित प्रभसिमरनसिंग अपयशी ठरताच *पंजाब संघाचा जीव पुन्हा एकदा टांगणीला लागला होता.*


तरीपण खेळपट्टीवर कर्णधार केएल राहुल असेपर्यंत पंजाबला विजयाची खात्री होती. वास्तविकत: अशा आणिबाणीच्या प्रसंगी मानसिक दडपण झेलणारा संघ बाजी मारून जातो आणि झालेही तसेच. कोलकाता संघाचे वस्त्रहरण सुरू असताना *फारसा प्रसिद्ध नसलेला प्रसिध क्रिष्णा* कृष्णावतार घेऊन नाईट रायडर्सच्या मदतीला धावला. त्याने टाकलेल्या फुलटॉसवर एव्हाना षटकार ठोकणारा राहुल गळपटला आणि त्रिफळाचित झाला. राहुल माघारी परतताच पंजाबच्या आशाआकांक्षाही जवळपास संपल्यात जमा होत्या. सोबतच या आयपीएल मध्ये ग्लेन मॅक्सवेलची बॅट कुंभकर्णी झोपेत असली तरी तो संघासाठी अंतिम हेल्पलाईन होता.


शेवटच्या षटकात ६ चेंडूत १४ धावांची गरज होती आणि सर्वांच्या नजरा मॅक्सवेलकडे होत्या परंतु कवचकुंडले हरवलेल्या कर्णासारखा तो हतबल दिसला. एवढेच काय तर अखेरच्या चेंडूवर षटकाराची गरज असताना त्याची ताकद कमी पडली आणि इंचभर अंतराने त्याचा फटका षटकारऐवजी *चौकार ठरताच पंजाब संघाचे गणित चौपट झाले*. आतापर्यंत आपल्या हक्काचे दोन सामने शेवटच्या षटकात गमावल्याने पंजाब संघ आयपीएल मधला चोकर्स ठरला आहे. तर शाहरुख खानच्या नाईट रायडर्स संघाने जिद्द न सोडता चिकाटीने हरलेला सामना आपल्याकडे खेचून आणल्याने ते खरोखरच बाजिगर ठरले आहेत. या पराभवाने पंजाब संघाने रिटर्न तिकिट जवळपास कंफर्म होण्याची चिन्हे आहेत तर कोलकाता संघ पुढील वाटचालीसाठी सज्ज झालेला आहे.


*************************************************

दि. ११ ऑक्टोबर २०२०

anilpawshekar159@gmail.com

+++++++++++++++++++++++++++++++++++++

नाईट रायडर्सचा पंजाबवर थरारक विजय नाईट रायडर्सचा पंजाबवर थरारक विजय Reviewed by News1 Marathi on October 11, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मुख्य अग्निशमन अधिकारी दिलीप गुंड यांच्या ध्येयपूर्ती पुस्तकाचे आयुक्तांच्या हस्ते प्रकाशन

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   दिलीप  गुंड यांचे "ध्येयपूर्ती" हे पुस्तक ग्रामीण भागातील प्रत्येक तरुणाला आशादायी व प्रेरणादायी असे...

Post AD

home ads