Header AD

आयपीएल "मुंबई विरूद्ध राजस्थान"डॉ. अनिल पावशेकर.....


अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर रंगलेल्या मुंबई विरूद्ध राजस्थान लढतीत मुंबई इंडियन्सने राजस्थानचा ५७ धावांनी रॉयल पराभव केला आहे. सामन्याच्या पुर्वार्धात स्वैर गोलंदाजी करणाऱ्या राजस्थान संघाला उत्तरार्धात एकेका धावेसाठी झगडावे लागले आणि खेळपट्टीवर हजेरी लावत प्रमुख फलंदाजांनी नांगी टाकल्याने हा संघ निर्धारित २० षटकाच्या आतच सर्वबाद झाला. १२० चेंडूत १९४ धावांचे गणित राजस्थानच्या आवाक्यात नक्कीच होते परंतु जसप्रित बुमराह आणि ट्रेंट बोल्टच्या गतीपुढे हार मानत हा संघ १३६ धावांत गतप्राण झाला.


आपल्या फलंदाजांवर विश्वास दाखवून रोहीतने पहिले फलंदाजी निवडली. तर स्मिथने त्याचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज जोफ्रा आर्चरला उशिरा आणून दोन्ही सलामीवीरांना सेट व्हायला मदत केली. मात्र क्लिंटनचा धडाडा फार काळ टिकला नाही आणि नवोदित त्यागीने त्याला फलंदाजी त्यागायला भाग पाडले. रोहीतच्या साथीला तिन क्रमांकावर सुर्यकुमार यादव आला आणि त्याने मुंबईची फलंदाजी उजळवून टाकली. सुर्यकुमार यादवच्या तडाख्याने राजस्थानच्या गोलंदाजांना नानी नक्कीच याद आली असेल. तर दुसरीकडे रोहीत नेहमीप्रमाणेच डाव गुंफण्यात गु़ंग होता. दहाव्या षटकांत रोहीतचा संयम सुटला आणि तो श्रेयस गोपालच्या गोलंदाजीत फसला. 


रोहीत बाद होताच इशान किशनने मैदान गाठले परंतु पुढच्याच चेंडूवर त्याने आपली विकेट फेकत संघाला अडचणीत आणले. अखेर कृणाल पांड्याने आणखी पडझड न होऊ देता संघाला शंभरीवर पोहचवले. यादव पांड्याची जोडी इतर गोलंदाजांना दाद देत नाही हे बघताच स्मिथने त्याचा हुकमाचा एक्का जोफ्रा आर्चरला कामाला लावले. त्यानेही कृणाल पांड्याची शिकार करत मुंबई एक्सप्रेसला ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा हा प्रयत्न तोकडा पडला. कारण यादवचा सुर्यकुमार ऐव्हाना मध्यान्ही आला होता आणि त्याला झाकोळणे केवळ अशक्य होते. त्यातच खतरनाक फलंदाज हार्दिक पांड्याला टॉम करनने जिवदान देत स्मिथची चिंता वाढवली. या दोघांनी ३६ चेंडूत ७६ धावांची बरसात करत सामना मुंबईकडे झुकवला.


सामना जिंकण्यासाठी राजस्थानची सर्व भिस्त रॉयल फलंदाज स्मिथ आणि फटकेबाजी करणाऱ्या संजू सॅमसनवर होती. सोबतच जॉस बटलर, टॉम करन आणि राजेश तेवटीया रसद पुरवणार होते. मात्र राजस्थानच्या डावाच्या प्रारंभीच प्रथमाग्रासे माक्षीकापात झाला. या सामन्यातही सलामीवीर यशस्वी जयस्वाल अयशस्वी होऊन परतला. ट्रेंट बोल्टच्या ४४० व्होल्टचा करंट बसताच यशस्वी जयस्वालला दर्जेदार गोलंदाजी काय असते हे कळून आले असेल. कर्णधार स्मिथ पाठलाग करताना यावेळी सुद्धा थोडा घाईतच दिसला. बुम बुम बुमराहची शिकार करण्याचा प्रयत्नात तो स्वत:च बुमराहची शिकार ठरला.


स्मिथचा बळी म्हणजे रोहीतसाठी जिंकण्याचा पासवर्ड होता. कारण स्मिथ एकदा तो खेळपट्टीवर स्थिरावला की तो ध्रुवताऱ्यासारखा अढळ होऊन जातो आणि संघाला एकहाती सामना जिंकून देतो. तरीपण मुंबईला एवढ्या लवकर जल्लोष करणे योग्य नव्हते कारण संजू सॅमसन मैदानात उतरला होता आणि त्याचा सामना होता सुसाट ट्रेंट बोल्टशी. याच ट्रेंट बोल्टने २०१९ विश्वचषकात टीम इंडियाच्या आशा आकांक्षा असलेल्या विराटला बाद केले होते आणि आपला संघ गाशा गुंडाळून मायदेशी परतला होता. बोल्टच्या आग ओकणाऱ्या चेंडूने सॅमसनचा घास घेताच मुंबईला जिंकण्याचा ओटीपी मिळाला होता.


तिन षटकात १२ धावांत ३ बळी जाताच राजस्थानचे तिनतेरा वाजणार यात दुमत नव्हतेच. मात्र एका टोकाला जॉस बटलरची एकाकी झुंज पाहण्यासारखी होती. त्याला ना टॉम करनची साथ मिळाली ना महिपाल लोमरोरची अथवा राजेश तेवटीयाची. बटलरचा जेम्स पॅटीन्सनने काटा काढताच विजयश्रीने राजस्थानला टाटा गुडबाय करत मुंबईकडे प्रस्थान करणे सुरु केले. कारण यानंतर बुमराहच्या गोलंदाजीचे राजस्थानच्या शेपटाकडे काहीच उत्तर नव्हते. "बर्म्युडा ट्रॅंगल असो की बुमराहचा ॲंगल असो" या दोन्ही बाबींचे गुढ कधी जगासमोर येईल असे वाटत नाही. १४५ च्या आसपासची गती, कधी बाऊंसर तर कधी स्लोअरवन यामुळे बुमराहला दुसऱ्या टोकावरून पाहण्यातच फलंदाज धन्यता मानतात. अखेर कसेबसे १८ षटक खेळून काढत राजस्थानच्या संघाने राहुटीकडे धाव घेतली.


निव्वळ एकतर्फी झालेल्या या सामन्याला राजस्थान संघाची विस्कळीत घडी कारणीभूत आहे. गोलंदाजीत जोफ्रा आर्चरच्या तोडीचा दुसरा गोलंदाज नव्हता तर कामचलाऊ फिरकीपटू बिनकामाचे ठरले. फलंदाजीतही नन्नाचाच पाढा होता. स्मिथ, सॅमसन, बटलर सोडले तर निव्वळ खोगिरभरतीच वाटते. राजेश तेवटीयाने पंजाब विरूद्ध दाखवलेलं कौशल्य तो पुन्हा कधी दाखवेल हे सांगता येत नाही. याउलट सुर्यप्रकाश यादव स्वयंप्रकाशीत होताच मुंबई संघासाठी तो सोनियाचा दिनू ठरला होता. गोलंदाजीत विश्वस्तरीय बुमराह, बोल्टने राजस्थानच्या फलंदाजांचे सुरवातीपासूनच नटबोल्ट कसत त्यांना डोके वर काढू दिले नाही. उत्तम फलंदाजी आणि अचूक गोलंदाजीला रोहीतच्या चलाख कप्तानीचा परिसस्पर्श होताच राजस्थानचा पराभव अटळ होता.


*************************************************************

दि. ०७ ऑक्टोबर २०२०

डॉ अनिल पावशेकर

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
आयपीएल "मुंबई विरूद्ध राजस्थान" आयपीएल "मुंबई विरूद्ध राजस्थान" Reviewed by News1 Marathi on October 07, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मुख्य अग्निशमन अधिकारी दिलीप गुंड यांच्या ध्येयपूर्ती पुस्तकाचे आयुक्तांच्या हस्ते प्रकाशन

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   दिलीप  गुंड यांचे "ध्येयपूर्ती" हे पुस्तक ग्रामीण भागातील प्रत्येक तरुणाला आशादायी व प्रेरणादायी असे...

Post AD

home ads