Header AD

मुंबई समोर 'कोलकाता' संघ "कोलमडला"

 


डॉ. अनिल पावशेकर.....


*************************************************


आयपीएलच्या दुसऱ्या सत्रात मुंबई इंडियन्स विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्सच्या सामन्यात कोलकाता फलंदाजांनी मुंबई गोलंदाजांसमोर शरणागती पत्करल्याने सामना एकतर्फी झाला. संघ नेतृत्त्वात केलेला बदल कोलकाता संघाला उभारी देऊ शकला नाही आणि अवघ्या १४८ धावांचे जुजबी आव्हान त्यांनी मुंबई संघासमोर ठेवले होते. अर्थातच टी ट्वेंटीत प्रती षटकामागे सात धावांचा पाठलाग खरेतर मुंबई इंडियन्स साठी शतपावली करण्यासारखे होते आणि ते लक्ष्य त्यांनी अवघ्या दोन गड्यांच्या मोबदल्यात पुर्ण केले.


मुंबई आणि कोलकाता संघाचे शत्रुत्व सर्वश्रुत आहेच. मात्र मुंबई इंडियन्सला रोहीतसारखा दमदार कर्णधार लाभला आहे. सोबतच बोल्ट बुमराहची दुधारी तलवार विरोधी फलंदाजांना कापून काढण्यात पटाईत आहे. शिवाय पांड्या बंधू, पोलार्ड सारखे अष्टपैलू खेळाडू मुंबई इंडियन्सच्या श्रीमंतीत भर घालतात. *कोलकाता संघ याबाबतीत दारिद्र्य रेषेखालील वाटतो*. बरे झाले दिनेश कार्तिकने संघाची धुरा इऑन मॉर्गनकडे सोपवली. तरीपण फलंदाजीत आंद्रे रसेल आणि गोलंदाजीत पॅट कमीन्स संघासाठी ओझे ठरत आहे. 


या दोन्ही खेळाडूंच्या गुणवत्तेबाबत शंका नाही पण *लंकेला सोन्याच्या विटा* असून काय फायदा? आठ सामने होऊनही हे दोघेही खेळाडू फॉर्मात येत नसतील तर संघाचे ओझे कोण वाहणार? गोलंदाजीत पॅट कमीन्सला दुसऱ्या टोकाकडून सहयोग मिळत नसल्याने तो एकटा फलंदाजांवर दबाब निर्माण करु शकत नाही. तर डेथ ओव्हरमध्ये सामना फिरविणारा आंद्रे *रसेलचा ग्राफ रसातळाकडे वाटचाल करत आहे*. शुभमन गिल आणि मॉर्गनने आश्वासक फलंदाजी जरूर केली आहे मात्र इतर फलंदाजांनी *हाताची घडी आणि तोंडावर बोट* ठेवल्याने कोलकाता संघ ठेचाळला आहे.


नाणेफेक जिंकून मॉर्गनने फलंदाजी तर निवडली परंतु राहुल त्रिपाठीने आक्रमण करायला चुकीचा गोलंदाज निवडला. बोल्टला तडकावतांना त्याचा झेल उडाला आणि सुर्यकुमार यादवने विद्युतगतीने डावीकडे झेपावत त्याचा अशक्यप्राय झेल टिपला. तर नितीश राणा कुल्टर नाईलच्या आखुड टप्प्याला फसला. दोन बळी लवकर बाद होऊनही शुभमन गिलने एक बाजू सांभाळली होती मात्र राहुल चहरला उंच टोलवण्याच्या नादात *तो पोलार्डची पोलादी भिंत ओलांडू शकला नाही*.


फलंदाजी वर लक्ष्य केंद्रित करायला कार्तिकने कर्णधारपदावर पाणी फेरले मात्र राहुल चहरला एक खराब फटका मारत तो बाद झाला आणि संघाला आणखी संकटात सोडून  चालता झाला‌. कोलकाता संघ कचाट्यात सापडताच रोहीतने बुमराह अस्त्र उपसले आणि त्याने खतरनाक आंद्रे रसेलला डिफ्युज करत कोलकाता संघाचा आशा आकांक्षांना मुठमाती देण्याचे काम केले. अखेर माॅर्गन आणि पॅट कमीन्सने ५६ चेंडूत ८७ धावा गोळा करत संघाचा कोसळणारा डोलारा सांभाळला परंतु १४८ ची धावसंख्या मुंबई इंडियन्सला घाबरवणारी अजिबात नव्हती.


मुंबई इंडियन्ससाठी हा सामना जिंकणे म्हणजे त्यांच्या *डाव्या हाताचा मळ होता*. त्यातच डावखुऱ्या क्लिंटन *डिकॉकने त्याच्या बॅटचा कॉक उघडताच* त्यातून धो धो धावा बरसल्या. कोलकाता गोलंदाजांची येथेच्छ पाठ शेकत त्याने रोहीतसोबत ९४ धावांची भक्कम सलामी देताच या सामन्यात विजयाचा रसगुल्ला कोलकाता संघाच्या हाती लागणार नाही हे स्पष्ट झाले होते. यापुढे कोलकाता संघाला प्लेऑफच्या तिकिटासाठी चांगलाचा संघर्ष करावा लागणार आहे तर मुंबई इंडियन्सने या विजयासह गुणतालिकेत आघाडी घेत आपला दबदबा कायम केला आहे.


***********************************************


दि. १७ ऑक्टोबर २०२०

anilpawshekar159@gmail.com


++++++++++++++++++++++++++++++++++


मुंबई समोर 'कोलकाता' संघ "कोलमडला" मुंबई समोर 'कोलकाता' संघ "कोलमडला" Reviewed by News1 Marathi on October 17, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

सन 2021-22 चा मालमत्ता कर 15 जूनपर्यत एकत्रित भरल्यास 10 टक्के सवलत

■ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा : महापौर व आयुक्तांचे आवाहन  ठाणे , प्रतिनिधी  :  ठाणे महापालिकेच्या वतीने सन 2021-22  या आर्थिक वर्षाची ...

Post AD

home ads