Header AD

अगंबाई अरेच्चा • चेन्नई सुपर किंग्जला सुर गवसला
डॉ. अनिल पावशेकर.....


दुबईत खेळल्या गेलेल्या चेन्नई विरूद्ध पंजाब सामन्यात पराभवाची हॅटट्रिक साधणारा चेन्नई संघ दमदार कमबॅक करत रूळावर परतला आहे. १२० चेंडूत १७९ धावांचे आव्हान सहज पार करत चेन्नईने या स्पर्धेतला आपला दुसरा विजय साकारला आहे. वेटरन शेन वॉटसनने *अजुनही यौवनात मी* हे दाखवत तडाखेबंद ५३ चेंडूत ८३ धावांची खेळी केली तर "फाफ" ड्युप्लेसीने पंजाब गोलंदाजांचे प्लॅन "फ्लॉप" करत आपल्या संघाला अवाढव्य विजय प्राप्त करून दिला. या पराभवाने पंजाब संघाने अंकतालिकेत डुबकी घेत तळ गाठला आहे.


पाच सामन्यात चार पराभव आणि केवळ एका विजयाची चव चाखणाऱ्या पंजाबने यावेळी नशिबाची बोली लावून नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. कर्णधार *राहुल आणि मयंक अग्रवाल हे पंजाब संघाचे जीव की प्राण आहेत*. त्यातच हे दोघे बाद झाले तर त्या  संघाची अवस्था ब्रेनडेड रूग्णासारखी होते. नाही म्हणायला गेल्या दोन सामन्यात निकोलस पुरमने या संघात जीव ओतण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे मात्र त्याचा फारसा उपयोग झालेला दिसत नाही. तर उर्वरित फलंदाज फारतर शोभेचे बाहुले म्हणून खेळपट्टीवर मिरवतांना दिसतात.


आठ षटकांत ६१ धावांची सुंदर सलामी देत राहुल आणि मयंक ने पंजाबची कहानी सुरु केली. मात्र पियुष चावलाने आपल्या पहिल्याच चेंडूवर मयंकचा बळी घेत पंजाबला पहिला हादरा दिला. यानंतर मनदिपच्या साथीने राहुलने फलंदाजीचा धडाडा लावला आणि ऑफ साईडला नेत्रदिपक फटकेबाजी करत आपला दर्जा दाखवला. ही जोडी शंभरी पार करेल असे वाटत असतांनाच रविंद्र जडेजाने *मनदिपचा दिप मालवून टाकला*. तत्पुर्वी मनदिपने चेन्नई गोलंदाजीचा दबाव झुगारून १६ चेंडूत २७ धावांचे योगदान दिले.


मनदिपची जागा घेणाऱ्या निकोलस पुरमने चेन्नई गोलंदाजांना शिंगावर घेत आक्रमक फलंदाजी सुरू केली. एक चौकार आणि तिन षटकार ठोकत त्याने आपल्या संघाला दिडशेवर पोहचवले. ही जोडी मैदानात असताना पंजाबचा संघ सहजच दोनशेचा पल्ला गाठेल अशी स्थिती होती. मात्र अठरावे षटक लागताच शार्दुल ठाकूरने आपली ठाकूरकी दाखवली. त्याने उत्तम टोलेबाजी करणाऱ्या निकोलस *पुरमच्या खेळीला पुर्णविराम तर दिला* सोबतच पुढच्या चेंडूवर राहुलचा महत्त्वपूर्ण बळी टिपत पंजाबला बॅकफूटवर ढकलले. खरेतर हाच सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला.


ही दुक्कल बाद होताच अजिबात फॉर्मात नसलेल्या ग्लेन मॅक्सवेल आणि सर्फराजने मैदान सांभाळले. या जोडीने उर्वरित १६ चेंडूत २६ धावा जोडल्या मात्र ते पुरेसे ठरले नाही. ग्लेन मॅक्सवेलची फलंदाजी पाहता नक्की स्वत: मॅक्सवेलच खेळत आहे की त्याचा डुप्लीकेट मैदानात उतरला आहे असा प्रश्र्न पडतो. *पंजाब संघाकडे उत्तम फिनिशरची वाणवा असल्याने* ते एकूण धावसंख्येत कमीतकमी १५/२० धावांना मुकले. अखेर एकदाचे विसावे षटक संपले आणि पंजाब संघाच्या १७८ धावा फळ्यावर लागल्या.


दोनशेच्या आतचे लक्ष्य बघताच चेन्नई संघाला हुरुप आला आणि वाटसन, ड्युप्लेसीने मोर्चा सांभाळला. आतापर्यंत फलंदाजीत अपयशी ठरलेल्या वाटसनने आपले अपयश झटकत चांगली सुरुवात केली. त्याला भरवश्याच्या ड्युप्लेसीने उत्तम साथ देत पंजाब गोलंदाजांना स्थिरावू दिले नाही. या कसलेल्या फलंदाजांनी *कोणत्याही गोलंदाजांना दाद न देता* दणकेबाज अर्धशतक ठोकत सामना चेन्नईच्या पदरात टाकला. सामी, काट्रेल वगळता पंजाबकडे चेंडू सोपवावा असा विश्वासू चेहरा नव्हता. आघाडीचे गोलंदाज बळी घेण्यात अपयशी ठरताच इतर गोलंदाज प्रभावहीन ठरले आणि पंजाब संघाला दहा गडी राखून मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले.

*************************************

दि. ०५ ऑक्टोबर २०२०

डॉ अनिल पावशेकर

anilpawshekar159@gmail.com

+++++++++++++++++++++++++++++

अगंबाई अरेच्चा • चेन्नई सुपर किंग्जला सुर गवसला अगंबाई अरेच्चा • चेन्नई सुपर किंग्जला सुर गवसला Reviewed by News1 Marathi on October 05, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

आर.टी.ई अंतर्गत ऑन लाईन प्रवेश प्रक्रिया सुरू पाल्यासाठी पालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा

■ महापौर नरेश म्हस्के व आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांचे आवाहन...   ठाणे , प्रतिनिधी  :  महापालिका कार्यक्षेत्रातील कायम  विनाअनुदानित/ स्वयंअर...

Post AD

home ads