Header AD

अगंबाई अरेच्चायु | युवा शक्ती समोर विराट शाही नतमस्तकडॉ. अनिल पावशेकर...


***********************************************


६ ऑक्टोबरला दुबईच्या रणांगणात झालेल्या तुंबळ युद्धात दिल्लीच्या *युवाशाहीने बंगळूरच्या विराटशाहीचा निर्णायक पराभव केला*. युवराज श्रेयसच्या नेतृत्त्वात दिल्लीने बंगळूरचा शहेनशहा कोहलीचे आक्रमण मोडून काढत अंकतालिकेत मुसुंडी मारत सर्वोच्च स्थान प्राप्त केले आहे. युवाशाही आणि बादशाहीच्या या प्रतिष्ठित लढतीत विजयाची अनारकली श्रेयस अय्यरच्या हाती लागली असून एरोन फिंच, एबीडी सारखे मातब्बर सरदार दिमतीला असूनही या द्वंदात *आरसीबीचे पानिपत झाले आहे.*


खरेतर विराटकडे सहा गोलंदाज आणि तिन अष्टपैलू खेळाडूंची श्रीमंती असल्याने त्याने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली. मात्र त्याचा हा निर्णय दिल्लीच्या पथ्यावरच पडला. दिल्ली संघाची धडकन असलेल्या पृथ्वीने या सामन्यात खेळपट्टीच्या दोन्ही बाजूंना खेळतांना २३ चेंडूत ४२ धावांची भक्कम खेळी करत विराटला चिंतेत टाकले होते. पृथ्वीचा बिमोड करायला विराटने मो. सिराज नावाचे आयुध वापरताच पृथ्वीची *शॉर्ट बट स्वीट* खेळी संपुष्टात आली. पृथ्वी परतताच कर्णधार श्रेयस अय्यरने धवनसोबत डाव सावरण्याचा प्रयत्न केला परंतु ही जोडी विशेष कमाल दाखवू शकली नाही.


सलामीवीर शिखर धवननेही पृथ्वीसारखेच आक्रमक रुप धारण केले होते परंतु टी ट्वेंटी तज्ञ गोलंदाज इसुरू उडाणाने शिखर धवन जास्त उडणार नाही याची काळजी घेतली आणि ८२ धावसंख्येवर धवनला माघारी धाडण्यात आले. दोन्ही सलामीवीरांची गच्छंती होताच अय्यर आणि रिषभ पंतवर दिल्लीची संपूर्ण मदार होती. त्यातच मोईन अलीला उंच टोलवण्याच्या नादात अय्यरला पडीकलने सुंदर झेल घेत टिपले. खरेतर *"श्रेयसचा" बळी जरी मोईन अलीच्या नावे गेला असला तरी त्याचे "श्रेय"* अफलातून झेल घेणाऱ्या देवदत्त पडीकलला जायला हवे होते.


अय्यरने मैदान सोडताच दिल्लीचा संघ यानंतर आचके देतो की काय अशी शंका यायला लागली होती परंतु स्टोईनिस आणि रिषभ पंतच्या जोडीने आक्रमक फलंदाजी करत मैदान दणाणून सोडले. या जोडीने चौथ्या गड्यासाठी ५३ चेंडूत घणाघाती ८९ धावांची भागीदारी करत सामन्यात रंग भरला. विशेषतः मार्कस स्टोईनिसने आरसीबी गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत अवघ्या २६ चेंडूत ५३ धावांची लयलूट केली. तर रिषभ पंतनेही तिन चौकार आणि दोन षटकार ठोकत २५ चेंडूत ३७ धावांची जलद खेळी केली. या दोघांच्या झंझावाताने दिल्ली संघाने २० षटकांत १९६ धावांचे आव्हान बंगळूर संघासमोर ठेवले.


आरसीबी संघ पाठलागासाठी मैदानात उतरला खरा मात्र ॲरोन फिंचचे ताळतंत्र काही केल्या ठिक वाटत नव्हते. त्यातच त्याला एकदोनदा जीवदान पण मिळाले. नवोदित देवदत्त पडीकलने आयपीएलची कारकिर्द तर भक्कमपणे सुरू केली मात्र अनुभवी रविचंद्रन अश्विनसमोर तो कच्चा निंबू ठरला. अश्र्विनने पडीकलचा पाडाव करताच *अक्षर पटेलनेही ॲरोन फिंचला अक्षरशः पटवत मैदानातून चालता केले.* केवळ २७ धावात दोन बळी जाताच आरसीबीचा गोटात चिंतेचे वातावरण पसरले आणि एबीडीसोबत विराटने संघाची धुरा सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र हा दिवस अजिबात आरसीबी संघाचा नव्हता.


एव्हाना धावगतीने आपला फुगवटा वाढवताच मोईन अली, विराटवर दबाव वाढू लागला होता. त्यातच मोईन अलीचा या हंगामातला हा पहिलाच सामना असल्याने तो लयात दिसत नव्हता. अखेर अक्षर पटेलने आपली जादू चालवत त्यालाही चालता केले. बाराव्या षटकात केवळ पाऊनशे धावांत आरसीबीचा रथ चिखलात फसला होता आणि केवळ विराट केविलपणे संघाच्या विजयासाठी धडपडत होता. मात्र काही झाले तरी रणांगणात शत्रूला दयामाया दाखवायचे नसते हे श्रेयस अय्यर जाणून होता. विराटसारख्या समर्थ योद्ध्याला नामोहरम करण्यासाठी त्याने आपली मुलुख मैदान तोफ कगिसो रबाडाला आक्रमणाला आणले आणि यापुढचा जे काही झाले त्याचे वर्णन *सबकुछ रबाडा शो* असे नक्कीच करता येईल.


भन्नाट गती, कमालीची अचूकता, जबरदस्त फिटनेस आणि अत्यंत चतुर गोलंदाज असलेल्या रबाडाने आरसीबी संघाची एकहाती धुळधाण उडवली. कोहलीचा "विराट" बळी घेताच त्याचा आवेग, जोश दुप्पटीने वाढला आणि त्याने सुंदर फलंदाजी करणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरसहीत शिवम दुबे आणि इसुरू उडाणाला सहज गिळंकृत केले. चार षटकांत चार बळी घेत रबाडाने आरसीबीचे कंबरडे मोडून काढले. *रबाडाच्या रांगडेपणा पुढे आरसीबी फलंदाज अगदी रांगल्यासारखे खेळत बाद झाले*. 


एका वाक्यात या सामन्याचे वर्णन करायचे झाले तर *आरसीबीला दिल्लीचा युवा जोश मानवला नाही.* सोबतच आरसीबीचे फलंदाजीत केवळ एबीडी आणि विराटवर अवलंबून राहणे त्यांना चांगलेच भोवले. याशिवाय अश्र्विन, अक्षर पटेल आणि नॉर्खिया या गोलंदाजांनी प्रारंभीच्या पाच षटकातच आरसीबीचे तिन महत्त्वपूर्ण गडी बाद करत त्यांना वरचढ होऊ दिले नाही. अष्टपैलू मोईन अली, वॉशिंग्टन सुंदर आणि शिवम दुबे पाठलाग करताना धावगतीचा दबाव झेलू शकले नाही. तर दुसरीकडे दिल्लीने प्रथम फलंदाजीचा आनंद घेत जवळपास दोनशेचा टप्पा गाठल्याने ते बिनधास्त होते आणि रबाडा सारखा दर्जेदार गोलंदाज संघात असल्याने आपल्या विजयाबद्दल ते निश्चिंत होते.

*************************************

दि. ०६ ऑक्टोबर २०२०

डॉ अनिल पावशेकर

anilpawshekar159@gmail.com

+++++++++++++++++++++++++++++

अगंबाई अरेच्चायु | युवा शक्ती समोर विराट शाही नतमस्तक अगंबाई अरेच्चायु  | युवा शक्ती समोर विराट शाही नतमस्तक Reviewed by News1 Marathi on October 06, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads