नवजात बालकांमधील छुप्या हृदयरोगाचे निदान करण्यासाठी पल्स ऑक्सिमीटरच्या तपासणीची उपयुक्तता समजून घेताना
लेखिका - डॉ. स्वाती गारेकर, कन्सल्टन्ट-पिडिआट्रिक कार्डिओलॉजी, फोर्टिस हॉस्पिटल, मुलुंड....
कोरोनाव्हायरसचा रुग्णाच्या फुफ्फुसांवर आणि श्वासोच्छवासावर परिणाम होतो ही गोष्ट आता आपल्यातील बहुतेकांना माहीत आहे. विषाणूसंसर्गाने बाधित फुफ्फुसांमुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी खाली जाते, पल्स ऑक्सिमीटर ऑक्सिजनच्या पातळीतील ही घसरण टिपू शकते. पल्स ऑक्सिमीटर हे लहानसे, कुठेही सोबत नेता येण्याजोगे उपकरण आहे, जे आपल्या बोटावर चिमट्यासारखे बसते आणि इन्फ्रारेड किरणांच्या मदतीने बोटातील रक्तामधील ऑक्सिजन पातळी किती आहे हे सांगते. हा आकडा 95% च्या खाली असणे हे ऑक्सिजनची पातळी कमी असल्याचे निदर्शक असते; अशा रुग्णाला डॉक्टरकडे नेऊन त्याच्यावर उपचार सुरू केले जायला हवेत. कोरोनाव्हायरसच्या संसर्गाखेरीज इतर अनेक आजारांमुळे रक्तातील ऑक्सिजनची पातळी खालावू शकते. न्यूमोनिया, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिजिज (COPD) किंवा फुफ्फुसांच्या इतर आजारांमुळे ऑक्सिजनची पातळी कमी होऊ शकते. आयसीयूमधील अनेक रुग्णांच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी असते.
पण पल्स ऑक्सिमीटरवर योग्य आकडा दिसण्यासाठी आणखी एक इंद्रीयसंस्था निरोगी असणे आवश्यक आहे हे तुम्हाला माहीत आहे का? ही यंत्रणा म्हणजे आपले हृदय. बाळांमधील अनेक प्रकारच्या हृदयदोषांमुळे त्यांच्या शरीरातील निळे (अशुद्ध) आणि लाल (शुद्ध) रक्त अनैसर्गिकरित्या एकमेकांमध्ये मिसळते किंवा फुफ्फुसांपर्यंत पुरेसे रक्त पोहोचण्यात अडथळा निर्माण होतो. तेव्हा फुफ्फुसे सुदृढ असतील तरीही रक्तातील ऑक्सिजनची पातळी घसरल्याचे पल्स ऑक्सिमीटरमुळे कळून येते. खरेतर बाळाच्या हृदयामध्ये एखादा विशिष्ट जन्मजात दोष असेल तर ही पातळी धोकादायक स्तरापर्यंत खाली घसरते. बाळ निळे पडू लागले (बहुतांश भारतीय बाळांच्या बाबतीत हे ओळखणे कठीण असते), तर वैद्यकीय टीम या गोष्टीची तपासणी करून समस्या शोधून काढू शकतात – बाळाच्या फुफ्फुसात दोष आहे की हृदयामध्ये दोष आहे हे ठरवू शकतात.
पण बाळ हॉस्पिटलमध्ये (प्रसूतीनंतर) असेपर्यंत निळे पडू लागले नाही तर खरी समस्या उद्भवते. त्याऐवजी ते घरी गेल्यानंतर तीन-चार दिवसांत हळूहळू निळे पडू लागते व काहीतरी समस्या आहे ही गोष्ट पालकांच्या लक्षात येईपर्यंत ते गंभीररित्या आजारी पडलेले असते आणि मग त्याला घेऊन हॉस्पिटलकडे धाव घेतली जाते.
नवजात बाळ निळे दिसो वा ना दिसो, पण हॉस्पिटलमध्ये असेपर्यंत त्याची साधी पल्स ऑक्सिमीटर तपासणी केली गेली तर ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याची चटकन कळून न येणारी गोष्ट निदर्शनास येऊ शकते. बाळाला डिस्चार्ज देताना केल्या जाणा-या या तपासणीला ‘’Pulse Oximetry Screening of newborns‘’ असे म्हणतात व जगभरात आणि भारतभरातील काही तुरळक हॉस्पिटल्समध्ये ही चाचणी करण्याचा नियम पाळला जातो.
बाळाच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी असल्याचे निदान झाले तर त्या बाळाच्या तब्येतीवर बारकाईने लक्ष ठेवले जाते व हृदयाच्या कार्यात खरोखरंच काही दोष आहे का हे तपासण्यासाठी एकोकार्डिओग्राम (हृदयाची अल्ट्रासाउंड तपासणी) काढला जातो. तेव्हा पल्स ऑक्सिमीटर रीडिंग हे फायद्याचे आहे कारण त्याच्यामुळे हृदयदोष असलेल्या बाळांच्या आजाराचे निदान होऊन लवकरात लवकर उपचार सुरू करता येतात. इथे एका गोष्टीची नोंद करणे महत्त्वाचे आहे आणि ती म्हणजे नवजात शिशूंमध्ये आढळणा-या काही हृदयदोषांमध्ये ऑक्सिजनची पातळी घटत नाही आणि पल्स ऑक्सिमीटर चाचणीमधून अशा दोषांचे निदान होऊ शकत नाही. अॅट्रियल सेप्टल डिफेक्ट (ASD) / व्हेन्ट्रीक्युलर सेप्टर डिफेक्ट (VSD), म्हणजे हृदयाला छिद्र असणे किंवा हृदयाची झडप अरुंद असणे ही अशा आजारांची काही उदाहरणे आहेत.
सरकारची ‘एक बूँद जिंदगी की’ ही पोलिओमुक्ती मोहीम प्रचंड प्रमाणात यशस्वी ठरली. आता वेळ आहे बाळांच्या हृदयासाठी आणखी एक मोहीम राबविण्याची जिचे नाव असेल ‘एक लाइट जिंदगी की’. तेव्हा आपल्या नवजात बाळाला घरी नेण्यापूर्वी डॉक्टरांना त्याची पल्स ऑक्सिमेट्री तपासणी करण्याची विनंती आवर्जून करा.

Post a Comment