मास्कच्या नावाखाली मास्क परीधान करणार्यांवर देखील कारवाई नागरिकांची लुटमार थांबविण्याची आपची मागणी
कल्याण | कुणाल म्हात्रे : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची पोलिसांच्या सहकार्याने मास्क न लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. मात्र हि कारवाई करतांना मास्कच्या नावाखाली रुमाल लावणाऱ्यांवर आणि मास्क नाकाच्या खाली आला तरी कारवाई करत असल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला असून नागरिकांची होणारी लुटमार थांबविण्याची मागणी पालिका प्रशासनाकडे केली आहे.
देशात कोरोना महामारीच्या काळात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आरोग्याच्या दृष्टिकोनातून कोरोनाचा रोगाचा प्रसार होऊ नये पसरू नये म्हणून सर्व लहान मोठे वयोवृद्ध सर्वांनी सार्वजनिक ठिकाणी तोंडाला मास्क, रुमाल बांधणे व तोंड झाकणे गरजेचे आहे. मनपा अधिकारी वर्ग व कर्मचारी यांच्याकडून प्रत्येक चौकातील रस्त्यावर पादचारी, वाहन चालक मास्क न वापरणाऱ्या व्यक्ती दंडात्मक कारवाई करत आहे. ते योग्यच आहे परंतु सदरची कारवाई करताना एखाद्या व्यक्तीचा मास्क हा नाकाखाली आला व मास्क ऐवजी रुमालाचा ज्याने वापर केला अशा नागरिकांवर देखील पालिका अधिकारी जबरदस्तीने दंडात्मक कारवाई करतांना दिसत आहे.
त्यामुळे जनतेचा मनात संभ्रम निर्माण झाला आहे की नेमका कोणता मास्क वापरल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव टळतो "कोरोना होणार नाही" तसेच मास्क म्हणून रुमालाचा वापर करणे हे चुकीचे आहे. दंड म्हणून तब्बल ५०० रुपये वसूल करण्यात येत असून, आधीच लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार गेल्याने दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असतांना हे ५०० रुपये कोठून भरणार असा सवाल नागरिकांना पडत आहे.
त्यामुळे मास्क कारवाई बाबतचे प्रशासनाला प्राप्त झालेले परिपत्रक मिळावे तसेच दंड वसूल केल्यानंतर पालिकेकडून कारवाई करण्यात आलेल्या नागरिकांना मास्क उपलब्ध करून देण्याची तजवीज ठेवण्याची मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने पालिका प्रशासनाकडे करण्यात आली असल्याची माहिती आपचे सहसचिव रवी केदारे यांनी दिली.

Post a Comment