काम करण्याची इच्छा असलेल्या महिलेला निश्चित रोजगार देणार कपिल पाटील
भिवंडी शहर जिल्हा भाजपाच्या महिला आघाडीच्या कार्यकारिणीची बुधवारी घोषणा करण्यात आली. खासदार कपिल पाटील व महिला प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले...
भाजपाच्या भिवंडी शहर जिल्हा महिला आघाडीच्या कार्यकारिणीची भाजपा खासदार कपिल पाटील व प्रदेशाध्यक्षा उमाताई खापरे यांच्या उपस्थितीत घोषणा करण्यात आली. त्यावेळी कपिल पाटील बोलत होते. या वेळी भाजपाचे शहराध्यक्ष संतोष शेट्टी, नगरसेवक व जिल्हा उपाध्यक्ष सुमित पाटील, महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस दिपाली मोकाशी, भिवंडी जिल्हाध्यक्षा ममता परमाणी आदी उपस्थित होते.
स्त्री शक्ती एकत्र आल्यास क्रांती घडू शकते, याचा गौरवपूर्ण उल्लेख खासदार कपिल पाटील यांनी केला. ते पुढे म्हणाले, ``महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भिवंडीतील प्रत्येक कुटूंबापर्यंत पोचावे. आपण एखाद्या महिलेला रोजगार उपलब्ध करून दिल्यास, त्या कुटुंबात भाजपाविषयी आत्मियता निर्माण होईल. रोजगाराबरोबरच केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांचा फायदा कुटुंबाला करून देण्यासाठी प्रयत्न करावेत.''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून घेतल्या जाणाऱ्या प्रत्येक निर्णयाला विरोध करण्याची विरोधी पक्षांची मानसिकता आहे. जनधन योजना, आयुष्मान भारत योजा, ३७० कलम, राफेल खरेदी आदींबाबत कॉंग्रेसकडून जनतेची दिशाभूल केली जात आहे, असा आरोप कपिल पाटील यांनी केला.
आपल्या कुटुंबापुढील व समाजापुढील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी प्रत्येक महिलेने सक्षम होण्याचा प्रयत्न करावा. या प्रयत्नांत भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांकडून मोलाची साथ मिळेल. आपले कुटूंब आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कुटुंबातील प्रत्येक महिलेचा हातभार लागतो. गृहिणीही विविध माध्यमातून कुटुंबाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करतात. भाजपाच्या महिला आघाडीकडून राज्यातील प्रत्येक महिलेला साथ दिली जाईल. भिवंडी ही दाटीवाटीची वस्ती असलेले श्रमजीवींचे शहर आहे. त्यातील श्रमजीवी कुटुंबांतील महिला भगिनींपर्यंत पोचण्यासाठी प्रत्येक महिला कार्यकर्त्यांने झटावे, असे आवाहन प्रदेशाध्यक्षा उमाताई खापरे यांनी केले.
काम करण्याची इच्छा असलेल्या महिलेला निश्चित रोजगार देणार कपिल पाटील
Reviewed by News1 Marathi
on
October 07, 2020
Rating:

Post a Comment