Header AD

गालावरची खळी तुझ्या लावी वेड मला
     डॉ.अनिल पावशेकर....

**********************************************


१८ ऑक्टोबर २०२० या तारखेला ड्रिम इलेव्हन आयपीएलमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण याच दिवशी सुपर संडेला दोन सामन्यात *भुतो न भविष्यती* अशी करामत होऊन चक्क तिन सुपर ओव्हर्सने सामन्याचे निकाल लागलेले आहेत. पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सच्या *लॉकी फर्ग्युसनच्या वेगवान माऱ्यापुढे सनराईझर्स हैदराबाद लॉकडाऊन झाले*. तर दुसऱ्या लढतीत किंग्ज इलेव्हन पंजाबने मुंबई इंडियन्सला मातीमोल करत आपला खळबळजनक विजय नोंदविला.


खरेतर मुंबई विरूद्ध पंजाब सामन्यात मुंबईचे पारडे नेहमीच थोडेफार जड राहते. मात्र यावेळी *कॅलीप्सो किंग ख्रिस गेल आणि लाईमफ्रेश सौंदर्यवती प्रिती झिंटा* चा परिसस्पर्श झाल्याने पंजाबचे किंग झळाळून निघाले. कर्णधार केएल राहुल आणि मयंक वर मदार असलेल्या पंजाब संघाला ख्रिस गेलचा खंदा आधार मिळताच मुंबई सारख्या तगडा संघाला त्यांनी पाणी पाजले. अर्थातच खेळाडूंच्या या भरगच्च कामगीरी सोबतच लक्ष्य वेधून घेतले ते *लिरिल गर्ल* प्रितीच्या उपस्थितीने.


शिमल्याच्या कुशीत उमललेल्या या सौंदर्यफुलाने सर्वांना आकर्षित केले ते १९९७ च्या लिरिल साबणाच्या जाहिरातीत. धबधब्याखाली मनसोक्तपणे चिंबणाऱ्या, बागडणाऱ्या या अप्सरेला पाहून टिव्हीसमोर बसलेले प्रेक्षक मनामनातून सुखावून जात असत. एव्हाना इतर जाहिरातींना कंटाळलेला प्रेक्षकवर्ग ही जाहिरात नक्कीच डोळ्यात तेल घालून बघत असणार. तिच्या पहाडी रूपाला नाजुकतेचे वलय लाभल्याने ती आणखीनच लोभसवाणी दिसते. त्यातच स्मित करताना तिच्या गालावरची खळी म्हणजे *लव्ह ॲट फर्स्ट साईट* करायला पुरेसे असते.


क्रिकेडवेडी असलेली प्रिती आणखी पाच वर्षांनी वयाची हाफ सेंच्युरी गाठेल. मात्र आजही तिचा जलवा कायम आहे. अगदी टी ट्वेंटी सारखी चपळ, अवखळ, खट्याळ असणारी ती सध्या मात्र कसोटी क्रिकेट सारखी परिपक्व, परिपुर्ण अवस्थेत दिसते. एरवी शांतचित्ताने सामने न्याहळणारी प्रिती पंजाब संघ यशाकडे झेप घेताच उसळून उठते आणि तिचे मोहक रुप बघून *मुंबई इंडियन्सचे खंदे समर्थकही पक्षांतर करायला बाध्य होत असतील* असे वाटते. 


मुख्य म्हणजे काल सुपर ओव्हर बघतांना तिचे शुभ्र वस्त्रातले मनोहारी, सुहास्य दर्शन ते सुद्धा हाती घेतलेल्या गडद लाल रंगी झेंड्याच्या पार्श्र्वभूमीवर वेडावून टाकणारं होतं आणि आपोआप ओठांवर,,,

*जरूरत क्या तुम्हे तलवारकी तीरों की खंजर की*

*नजर भरके जिसे तुम देख लो  वो खुदही मर जाऐ* ह्या ओळी आपोआप यायला लागल्या होत्या.


इकडे प्रितीचे सोज्वळ, सालस रुप प्रेक्षकांना मोहीनी घालत होतं तर मैदानात फलंदाज आणि गोलंदाजांत रणकंदन माजलेलं होतं. पहिल्या सुपर ओव्हरमध्ये जसप्रित बुमराहच्या यॉर्करने पंजाबला खिळवून ठेवले होते तर प्रत्युत्तरात *शेरास सव्वाशेर* ठरत शेरखान मोहम्मद सामी ने पंजाबला तारले होते. अखेर दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये मुंबईने ११ धावा काढल्या परंतु युनिव्हर्सल बॉस म्हणजेच *गेलच्या तडाख्यात मुंबईचे बारा वाजवले गेले*. एकंदरीत काय तर प्रितीची गालावरची खळी असो की मैदानातली राहुल,गेलची खेळी असो,,,या सामन्यात क्रिकेट, रोमांच आणि सौंदर्याचा अफलातून मिलाफ क्रिकेटरसिकांनी अनुभवला आहे.

********************************************

दि. १९ ऑक्टोबर २०२०

डॉ अनिल पावशेकर

anilpawshekar159@gmail.com

++++++++++++++++++++++++++++++++++

गालावरची खळी तुझ्या लावी वेड मला गालावरची खळी तुझ्या लावी वेड मला Reviewed by News1 Marathi on October 19, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

सन 2021-22 चा मालमत्ता कर 15 जूनपर्यत एकत्रित भरल्यास 10 टक्के सवलत

■ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा : महापौर व आयुक्तांचे आवाहन  ठाणे , प्रतिनिधी  :  ठाणे महापालिकेच्या वतीने सन 2021-22  या आर्थिक वर्षाची ...

Post AD

home ads