जोशी कुटुंबीयांनी केला अनाथ मुलांसोबत वाढदिवस साजरा
कल्याण | कुणाल म्हात्रे : कल्याण मधील समाजसेवक कौस्तुभ जोशी यांनी आपला मुलगा मल्हार याच्या वाढदिवसाला वायफळ खर्च न करता हाच खर्च अनाथ आश्रमातील मुलांना अन्न धान्याची मदत करून साजरा करत सामाजिक भान जपले आहे.
कोरोना काळात लॉकडाऊनमुळे सर्वच बंद होते. यामुळे अनेक अनाथ आश्रमं देखील बाहेरील व्यक्तींसाठी बंद करण्यात आली होती. या ६ महिन्यांच्या कालवधीत येथील मुलांचा बाहेरील जगाशी एकप्रकारे संपर्क तुटला होता. आता अनलॉकचे मिशन बिगेन अगेन सुरु असल्याने या अनाथ आश्रमात अनेक जण जाऊन या मुलांना भेटत आहेत. अशाच प्रकारे कल्याण मधील जोशी कुटुंबियांनी देखील टिटवाळा म्हसकळ येथील पारस बालभवन आणि वृद्धाश्रमात जाऊन त्यांच्या कुटुंबातील मल्हार या चिमुकल्याचा वाढदिवस साजरा केला.
यावेळी जोशी कुटुंबीयांनी येथील लहान मुलांसोबत नाचगाणी करत केक कापून मुलांसमवेत स्नेहभोजन देखील घेतले. तसेच या अनाथ आश्रमास अन्नधान्य स्वरूपात मदत देखील केली. पारस बालभवन या अनाथ आश्रमात सुमारे ५० बालकं असून जोशी कुटुंबीयांनी आजचा वेळ त्यांच्यासमवेत घालवल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते.
यावेळी दीपक जोशी, नयना जोशी, कौशल जोशी, राम जोशी, माधवी जोशी, मंदार जोशी, वसंत दिक्षित, रोहिणी दिक्षित, मानस जोशी, प्रदीप पांजरी, प्रतिभा पांजरी, प्रथमेश पांजरीआदी जोशी कुटुंबीय उपस्थित होते. तर जोशी कुटुंबीयांनी आपला आनंद अनाथ मुलांसोबत साजरा केल्याबद्दल पारस बालभवनचे संजय गुंजाळ आणि संगीता गुंजाळ यांनी आभार मानले.
Post a Comment