दुबईत गोलंदाजांचा दबदबा डॉ.अनिल पावसेकर
दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या दिल्ली कॅपीटल्स आणि राजस्थान रॉयल्सच्या लढतीत गोलंदाजांचा दबदबा दिसून आला. दोन्ही बाजूंनी वेगवान गोलंदाजांनी फलंदाजांना बांधून ठेवल्याने या सामन्यात मोठी धावसंख्या उभारल्या गेली नाही. राजस्थानच्या जोफ्रा आर्चर, जयदेव उनाडकट तसेच दिल्लीच्या कगिसो रबाडा, नॉर्जे आणि नवोदित तुषार देशपांडेने आपल्या तुफानी गोलंदाजीने फलंदाजांवर अंकुश ठेवला. टी ट्वेंटीतही गोलंदाज सामना जिंकून देऊ शकतात हे कालच्या सामन्यात दिसून आले.
प्रथम फलंदाजीला येणाऱ्या दिल्लीची सुरवात फारच वाईट झाली. सलामीवीर पृथ्वीचा पहिल्याच चेंडूवर त्रिफळा उडवत जोफ्रा आर्चरने राजस्थानला रॉयल सुरवात करून दिली. तर बऱ्याच प्रतिक्षेनंतर दुसऱ्यांदा संधी मिळालेल्या अजिंक्य रहाणेने *असून अडचण नसून खोळंबा* ही प्रतिमा जपण्यातच धन्यता मानली. जोफ्रा आर्चरने या दोघांचा बळी घेत दिल्लीला बॅकफुटवर आणले. मात्र शिखर धवनच्या साथीला कर्णधार श्रेयस अय्यर येताच दिल्लीने बाळसं धरणे सुरू केले होते. या दोघांनी ८५ धावांची भक्कम भागीदारी करत दिल्लीला शतकापर्यंत आणून सोडले होते.
धवन आणि श्रेयस अय्यरने अर्धशतक झळकावून संघाला सुस्थितीत आणले मात्र यानंतर इतर फलंदाज या सुस्थितीचा फायदा उठवू शकले नाहीत. मार्कस स्टोईनिसची भट्टी चांगली जमली नाही तर *ॲलेक्स कॅरी आपला डाव फार दूर कॅरी करू शकला नाही*. बाराव्या षटकात धवन बाद होतात धावगतीने धापा टाकणे सुरु केले होते. त्यातच गोलंदाजीत जोफ्रा आर्चरची अचूकता, उनाडकटची विविधता आणि कार्तिक त्यागीच्या भेदकतेने दिल्ली संघाने कशीबशी १६१ धावापर्यंत मजल मारली.
खरेतर बेन स्ट्रोक्सच्या आगमनाने राजस्थानच्या रॉयलतेत चांगलीच भर पडली होती. शिवाय त्याची तडाखेबंद फलंदाजी पाहता राजस्थानला १६१ चे लक्ष्य ओलांडायला फारसा घाम गाळावा लागेल असे वाटत नव्हते. मात्र *चितल ते घडत नाही* म्हणतात ते याचकरीता. राजस्थानच्या रॉयल फलंदाजांचा दिल्लीच्या गोलंदाजांनी चांगलाच घाम फोडला आणि त्यांना शरण येण्यास भाग पाडले. स्ट्रोक्स, बटलर या इंग्लिश जोडीने ३७ धावांची वेगवान सलामी तर दिली परंतु सुपरफास्ट नॉर्जेने बटलरच्या दांड्या उडवत दिल्लीची विकेट बोहणी करून दिली.
राजस्थानचा कर्णधार, म्हणजेच स्मिथच्या बॅटने सध्या त्याच्याशी अबोला धरल्याने तो धावसंख्येत फारशी भर न घालताच माघारी परतला. स्ट्रोक्स, संजू सॅमसनने उपयुक्त खेळी केल्या परंतु त्या पुरेशा नव्हत्या. त्यातच मागच्या सामन्यात सुंदर खेळी करणारा रेहान पराग दुर्देवाने धावबाद होताच राजस्थानची वाट अवघड होत गेली. अनुभव रॉबीन उथप्पाने ३७ धावांची झुंजार खेळी करत सामना वाचवण्याचा प्रयत्न केला परंतू तो आणि जोफ्रा आर्चर बाद होताच एकटा तेवटीया जिंकून देऊ शकणार नाही हे स्पष्ट झाले होते.
दिल्लीचा संघ या विजयाने गुणतालिकेत सर्वोच्च स्थानी पोहोचला असला तरी त्या संघाचे प्रमुख खेळाडू दुखापतीमुळे बेजार झाले आहेत. मात्र कधी फलंदाज तर कधी गोलंदाज सामना फिरवत असल्याने ते सध्या निश्चिंत आहेत. तर *राजस्थान संघाचे कभी खुशी कभी गम चालू आहे*. त्यांची फलंदाजीची मदार स्मिथ, सॅमसनवर असून या दोन्ही फलंदाजांची सध्या लय हरवली आहे. गोलंदाजीत जोफ्रा आर्चर आणि उर्वरित गोलंदाज चांगली कामगिरी करत असले तरी राजस्थानला स्पर्धेत टिकून राहण्यासाठी फलंदाजांनी आपली जबाबदारी ओळखत चांगल्या खेळी करणे आवश्यक आहे. अन्यथा प्ले ऑफमध्ये शिरकाव करण्यासाठी त्यांना एखादा चमत्काराची वाट बघावी लागेल.
************************************************
दि. १५ ऑक्टोबर २०२०
anilpawshekar159@gmail.com

Post a Comment