Header AD

प्रचंड "रन"धुमाळीत दिल्ली विजयीडॉ. अनिल पावशेकर...


शारजा इथे खेळल्या गेलेल्या दिल्ली विरूद्ध कोलकाता दरम्यानच्या सामन्यात प्रचंड "रन"धुमाळी माजली आणि गोलंदाजांची कत्लेआम झाली. अत्यंत अटीतटीच्या या लढतीत दिल्लीने कोलकाता संघाचा कडवा प्रतिकार मोडून काढला आणि आपला विजय नोंदविला. छोटे मैदान, सपाट खेळपट्टी आणि समोर घणाघाती फलंदाज असल्याने या द्वंदात दोन्ही बाजूच्या गोलंदाजांची चांगलीच ससेहोलपट झाली. गोलंदाजांना ना पिचचे सहाय्य, ना मैदानाच्या सिमा अनुकूल असल्याने *४० षटकात तब्बल ४३८ मुसळधार धावा कोसळल्या*.


खरेतर कोलकाता संघाने नाणेफेकीचा कौल त्यांच्या बाजूने लागुनही गोलंदाजी पत्करली. तर दुसरीकडे दिल्लीच्या जहाल फलंदाजांनी याचा मनसोक्त फायदा घेतला. गोलंदाजीत स्विंग नसल्याने दिल्लीचे पृथ्वी क्षेपणास्त्र प्रक्षेपीत करायला आदर्श परिस्थिती होती. त्यानेही धवनसोबत जलदगतीने सलामी देत सहाव्या षटकातच संघाचे अर्धशतक फळ्यावर लावले. मात्र याच षटकांत धवनचा बळी गेला. पृथ्वीच्या जोडीला कर्णधार श्रेयस अय्यर येताच कोलकाता गोलंदाजांना *पळता भुई थोडी झाली.* कारण दिल्ली फलंदाजांचे चेहरे वेगळे असले तरी फलंदाजीची तर्हा मात्र एकच आहे आणि ती म्हणजे आक्रमण.


धवनपासून सुरू झालेली कोलकाता गोलंदाजांची धुलाई काही केल्या थांबायची चिन्हे दिसत नव्हती. एखादा फलंदाज बाद झाला की येणारा फलंदाज तिच बॅट परत घेऊन आल्यासारखा गोलंदाजांना बदडत होता. पृथ्वीचे ४ चौकार आणि ४ षटकारांसहीत ४१ चेंडूत ६६ धावांचे भ्रमण आटोपताच श्रेयस अय्यरने ड्रायव्हिंग सिटवर कब्जा केला. त्यानेही कोलकाता गोलंदाजांना *चौदावे रत्न दाखवत* ७ चौकार आणि ६ षटकारांची आतिषबाजी केली. या धुमश्चक्रीत रिषभ 'पंतनेही' १७ चेंडूत ३८ धावांची 'पतंग' उडवत कोलकाताच्या *जखमेवर मीठ चोळले.* अखेर २० षटके संपताच कोलकाता गोलंदाजांनी समाधानाचा सुस्कारा सोडला मात्र तोपर्यंत २२८ धावांचा डाका पडून गेला होता.


दोनशेहून अधिक धावांचे लक्ष्य अशक्यप्राय नसते परंतु नेहमीच खडतर असते. याकरिता नियोजन महत्त्वाचे असते. त्यातच सुनिल नरेन ही लॉटरी नेहमीच फळफळेल असेही नाही. नरेनचा नैवैद्य दाखवून कोलकाता संघाने वाटचाल सुरू केली परंतु *शुभमन गिलची फलंदाजी यासामन्यात शुभलाभ देऊ शकली नाही*. तरीपण नितिश राणाने एक टोक चांगले राखून ठेवले होते. प्रचंड अपेक्षा असलेला आरडीएक्स ब्रांड आंद्रे रसेल मैदानात उतरला खरा परंतू तो ॲक्टीव्हेट व्हायच्या पहिलेच कसलेल्या कगिसो रबाडाने त्याला डिफ्यूज करून टाकले. रसेलकडून रसभंग होताच कर्णधार दिनेश कार्तिकने मोर्चा सांभाळला मात्र त्याची विस्कळीत खेळी पाहता तो संघाला जिंकून देईल असे सध्यातरी वाटत नाही.


२२८ धावांची श्रीमंती पाठीशी असल्याने हर्षल पटेलसारखा दारिद्र्यरेषेखालचा गोलंदाजही आग ओकू लागला होता. त्याने नितिश राणा आणि दिनेश कार्तिकला लागोपाठ चालता करत मैदानात दिल्लीचे निशाण फडकवणे चालू केले. असे असले तरीही कोलकाता संघ *मॉर्गनमुळे प्रचंड आशावादी होता*. त्यानेही आपल्या नावाला जागत अवघ्या १८ चेंडूत एक चौकार आणि पाच षटकार खेचत सामन्यात चुरस निर्माण केली होती. मात्र महागाई सारखं सातत्याने वाढणाऱ्या धावगतीने तो हतबल झाला होता. राहुल त्रिवेदी आणि *क्विक गन मॉर्गनने* ताबडतोब फायरींग करत ७८ धावांची अमूल्य भागीदारी केली. अखेर माॅर्गन नावाची मशिनगन शांत होताच राहुल त्रिवेदीचेही अवसान गळाले आणि कोलकाता संघाला दिल्ली सल्तनतपुढे पांढरे निशाण फडकवण्यशिवाय पर्याय उरला नव्हता.


अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही कोलकाता संघाच्या फलंदाजांनी दाखवलेली जिद्द, चिकाटी वाखाणण्याजोगी आहे. मात्र दिनेश कार्तिकला अजूनही लय सापडलेली दिसत नाही. त्यातच सुनिल नरेन, आंद्रे रसेल अजुनही लौकिकास साजेसा खेळ करु शकले नाहीत. यामुळे सध्या चांगल्या लयात असलेल्या इऑन मॉर्गनला फलंदाजीत बढती देऊन खेळवणे कोलकाता संघासाठी इष्ट राहील. *कर्णधार दिनेश कार्तिकला कालीमाता एवढी सुबुद्धी देईल अशी अपेक्षा आहे.* दिल्लीतर्फे पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर आणि रिषभ पंतने खेळपट्टीचा अचूक अंदाज घेत मोठी धावसंख्या उभारली आणि इथेच त्यांनी अर्धा विजय मिळवला होता. उरलेले अर्धे काम सतत उंचावणाऱ्या धावगतीने केले आणि दिल्ली संघ पुन्हा एकदा तख्त राखण्याच्या अग्निदिव्यातून सहीसलामत बाहेर पडला.

************************************* 

दि. ०४ ऑक्टोबर २०२०

डॉ अनिल पावशेकर

anilpawshekar159@gmail.com

+++++++++++++++++++++++++++++

प्रचंड "रन"धुमाळीत दिल्ली विजयी प्रचंड "रन"धुमाळीत दिल्ली विजयी Reviewed by News1 Marathi on October 04, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

आर.टी.ई अंतर्गत ऑन लाईन प्रवेश प्रक्रिया सुरू पाल्यासाठी पालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा

■ महापौर नरेश म्हस्के व आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांचे आवाहन...   ठाणे , प्रतिनिधी  :  महापालिका कार्यक्षेत्रातील कायम  विनाअनुदानित/ स्वयंअर...

Post AD

home ads