पिस्टलसह चार जिवंत काडतूस बाळगणारे दोघे खडकपाडा पोलिसांच्या ताब्यात
कल्याण | कुणाल म्हात्रे : गुप्त बातमीदारा कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे खडकपाडा पोलिसांनी शुक्रवारी संध्याकाळी योगी धाम परिसरातून पिस्टलसह चार जिवंत काडतूस बाळगणाऱ्या दोघांना बेड्या ठोकल्या असल्याची माहिती परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.
खडकपाडा पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांना योगीधाम परिसरात अग्नीशस्त्रासह दोन जण येणार असल्याची माहिती मिळाली होती. चौधरी यांनी हि बाब खडकपाडा पोलीस स्टेशनने व.पो.नि. अशोक पवार यांना देत त्यांच्या आदेशानुसार योगी धाम परिसरातील गुरु आत्मन बिल्डींग समोर सापळा रचला. त्यानंतर काही वेळाने दोन इसम गुरू आत्मन बिल्डींगच्या समोर येताना दिसले. गुप्त बातमीदाराने तपास पथकाकडे इशारा करून हेच ते दोन इसम असल्याचे सांगताच. पथकातील कर्मचारी यांनी शिताफीने दोन्ही इसमांना पळण्याची संधी न देता ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे सुशिल गणपत भोंडवे (२७) रा. इगतपुरी व गौरव सुनिल खर्डीकर (२८) रा. कशिश पार्क, कल्याण प. अशी आहेत. त्यांची यावेळी झडती घेतली असता सुशिल भोंडवे यांच्याकडे २० हजार किमतीची एक सिंगल बॅरेल असलेली लोखंडी धातुची पिस्टल व गौरव खर्डीकर याच्याकडे बाराशे रुपयांचे एकूण चार जिवंत पिस्टलचे राऊंड असा मुद्देमाल मिळून आला.
हे दोन्ही इसम हे एक पिस्टल व चार जिवंत राऊंड बेकायदेशिर रित्या विना परवाना बाळगताना मिळून आल्याने त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कार्यवाही सहा.पो.नि प्रितम चौधरी करीत आहेत. सदरची कामगिरी खडकपाडा पोलीस ठाण्याचे व.पो.निरीक्षक अशोक पवार, पो.नि.(गुन्हे) अंकुश बांगर, तपास पथकाचे अधिकारी सहा.पो निरी. प्रितम चौधरी व तपास पथकाचे कर्मचारी पोहवा चव्हाण, पवार, देवरे, पोना राजपुत, पोशि थोरात, आहेर, कांगरे, जाधव, चन्ने यांनी केलेली आहे.

Post a Comment