Header AD

राजस्थान रॉयल्सवर दिल्ली कॅपीटल्स भारीडॉ. अनिल पावशेकर....


शारजाच्या वाळवंटात राजस्थानचे रॉयल जहाज पुन्हा एकदा फसले असून दिल्ली कॅपीटल्सने त्यांना ४६ धावांनी मात दिलेली आहे. नाणेफेक जिंकूनही दिल्लीसारख्या तडाखेबंद फलंदाजी असलेल्या संघाला *पहले आप पहले आप* म्हणणे स्मिथला भारी पडले आहे. पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, मार्कस स्टोईनिस आणि हेटमायरने धावांचे धुमशान करत राजस्थानला १८४ धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र दिल्लीच्या रविचंद्रन अश्विन आणि कगिसो रबाडाने राजस्थान संघाची मुस्कटदाबी करत त्यांना शरण येण्यास भाग पाडले.


खरेतर दिल्ली संघात तब्बल आठ घणाघाती फलंदाजांचा भरणा असल्याने त्यांना पहिले फलंदाजीला आमंत्रण देणे म्हणजे *स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेतल्यासारखे आहे*. कारण दिल्लीच्या डावात नियमितपणे गडी बाद होत असले तरी तिथे शोक व्यक्त करायला कोणीही तयार नव्हते. एखादा फलंदाज बाद झाला तरी येणारा फलंदाज *गयी बात गणपतके साथ* करत आपली मनसोक्तपणे ठोकाठोकी सुरू करत होता. भलेही दिल्लीच्या डावात प्रारंभीच शिखर धवन बाद झाला परंतु सेहवागचे पॉकेट डायरी रुप असलेल्या पृथ्वीने गोलंदाजांना न जुमानता आक्रमक रुप धारण केले होते. भलेही पृथ्वीची खेळी अल्पजीवी ठरली असली तरी त्याने दिल्लीच्या डावाला टॉप गिअरमध्ये टाकले होते.


त्यातच *दिल्लीचे दिलोजान असलेले श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत* दुर्दैवाने धावबाद झाल्याने तो संघ दडपणाखाली येतो की काय अशी शंका होती. कारण ९ षटकांत त्यांचे ४ टॉप ऑर्डरचे फलंदाज तंबूत परतले होते. यावेळी खेळपट्टीवर शिमरन हेटमायर आणि स्टोईनिस ही ढवळ्या पवळ्याची जोडी उपस्थित होती. या जोडीने राजस्थानच्या गोलंदाजांची अजिबात मुर्वत न ठेवता कुटाई सुरू केली. मात्र ३० चेंडूत ४ षटकारांसह ३९ धावा करणारा स्टोईनिस बाद होताच स्मिथच्या संघाला दिल्लीवर दबाव वाढायची संधी मिळाली. तर समोर बाका प्रसंग पाहताच हेटमायरने फायर करत राजस्थान संघाला सडेतोड प्रत्युत्तर दिले.


हेटमायरने २४ चेंडूत तुफानी ४५ धावा फटकवत संघाला दिडशेजवळ आणून सोडले होते. हेटमायर परतताच अक्षर पटेल आणि हर्षल *पटेलने प्रचंड टोलवाटोलवी करत राजस्थान गोलंदाजांना बेजार करुन सोडले*. या दोघांसोबतच मिस्टर एक्स्ट्रा म्हणजेच अतिरिक्त १४ धावांनी दिल्लीला १८४ धावांपर्यंत मजल मारता आली. खरेतर दिल्ली संघ ठराविक अंतराने गडी गमावत असतांना देखिल राजस्थानचा संघ दिल्लीला कमी धावसंख्येवर रोखू शकला नाही. जोफ्रा आर्चर वगळता इतर गोलंदाज दिल्ली फलंदाजांवर अंकुश ठेऊ शकले नाहीत.


या स्पर्धेच्या सुरवातीला स्मिथ सॅमसनच्या धडाडीने राजस्थान संघ सहज सामने जिंकायचा. मात्र या दोन्ही फलंदाजांना सध्या दृष्ट लागली की काय अशी शंका येऊ लागली आहे. खेळपट्टीवर दमदारपणे पाय रोवून डावाची गु़ंफण करणारा स्मिथ सध्या लगबगीत खेळत लवकर बाद होतो आणि त्याच्या संघाला पोरके करून जातो. या दोघांशिवाय केवळ जॉस बटलरच नावाजलेला फलंदाज उरतो. बाकी फलंदाज म्हणजे *ऊंट किस करवट बैठेगा* हे सांगण्यासारखे आहे. शिवाय मोठ्या संख्येचा पाठलाग करताना भागीदारी करणे महत्त्वाचे असते. शारजाची खेळपट्टीही सध्या मंदावत चालल्याने पाठलाग करताना फलंदाजांना चांगलाच दमछाक होतो.


पहिल्या १० षटकातच बटलर, स्मिथ आणि सॅमसन माघारी परतताच राजस्थानची कुंडली दिल्लीच्या हातात पडली. त्यातच *ओल्ड इज गोल्ड* रविचंद्रन अश्विन आणि कसलेला कगिसो रबाडाने स्टोईनिसच्या साथीने राजस्थानची फळी कापून काढत त्यांचा अवघ्या १३८ धावांत खेळ खल्लास करून टाकला. दिल्लीच्या एकाही फलंदाजाने पन्नाशी गाठली नव्हती. मात्र त्यांच्या छोटेखानी परंतु उपयुक्त खेळीने दिल्लीने राजस्थान समोर  चांगले आव्हान उभे केले होते. तर क्षेत्ररक्षणात त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत तब्बल आठ फलंदाजांना झेलबाद केले. विशेषतः शिमराॅन हेटमायरने स्मिथच्या अवघड झेल सोबतच एकूण तिन झेल घेत आपली चुणूक दाखवून दिली. फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांच्या सांघीक कामगीरीने दिल्लीने राजस्थानला सहज लोळवले. या विजयाने दिल्ली संघाने अंकतालिकेत भरारी घेत सर्वोच्च स्थान प्राप्त केले आहे.


दि. १० ऑक्टोबर २०२०

डॉ अनिल पावशेकर

anilpawshekar159@gmail.com


राजस्थान रॉयल्सवर दिल्ली कॅपीटल्स भारी राजस्थान रॉयल्सवर दिल्ली कॅपीटल्स भारी Reviewed by News1 Marathi on October 10, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मुख्य अग्निशमन अधिकारी दिलीप गुंड यांच्या ध्येयपूर्ती पुस्तकाचे आयुक्तांच्या हस्ते प्रकाशन

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   दिलीप  गुंड यांचे "ध्येयपूर्ती" हे पुस्तक ग्रामीण भागातील प्रत्येक तरुणाला आशादायी व प्रेरणादायी असे...

Post AD

home ads