उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या घटनेच्या निषेधार्थ कल्याणात युवक काँग्रेसची निदर्शने
कल्याण | कुणाल म्हात्रे : उत्तर प्रदेशमध्ये युवतीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा आणि राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्की विरोधात कल्याणात युवक काँग्रेसतर्फे निदर्शने करण्यात आली. कल्याण पश्चिमेतील खडकपाडा सर्कल परिसरात युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष मनिष देसले यांच्या पुढाकाराने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत हे आंदोलन केले.
उत्तर प्रदेश मधील युवतीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर संपूर्ण देशभरात संताप व्यक्त होत आहे.त्यातच पिडीत युवतीच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी चाललेल्या काँग्रेसचे महासचिव खासदार राहुल गांधी यांना अडवण्यात आले. तसेच त्यांना धक्काबुक्की झाल्याचा प्रकारही घडला. या सर्वांचा युवक काँग्रेसतर्फे निषेध करण्यात आला. तर काँग्रेस कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पोस्टर जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी मध्यस्थी करत हे पोस्टर खेचून घेतले.
उत्तर प्रदेशमध्ये घडलेली घटना अत्यंत लाजिरवाणी असून त्यामुळे संपूर्ण देशाला काळिमा फासला गेला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन केल्याचे युवक काँग्रेसचे कल्याण जिल्हाध्यक्ष मनिष देसले यांनी सांगितले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ब्रीज दत्त, प्रदेश सचिव गायत्री सेन, कल्याण जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, कल्याण शहर युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष मनिष देसले, महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी,शकील खान, कपिल सूर्यवंशी, प्रसन्न ताकपेरे, शिवम सिंह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment