Header AD

अब्दुल्लांची दिवानगी मेहबुबांची बेपर्वाई डॉ. अनिल पावशेकर

*************************************************

पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या अध्यक्षा आणि जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री असलेल्या ६१ वर्षीय मेहबूबा  मुफ्ती यांनी नुकतेच तिरंग्याबाबत मुक्ताफळे उधळली असून यामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. "अनंतनाग" मधून दोनदा खासदार राहीलेल्या मेहबुबा यांनी "नागा"पेक्षाही जहरी विष ओकून एकप्रकारे आपल्या देशद्रोही मानसिकतेचा परिचय दिलेला आहे. सरकारी पाहुणचारातून नुकतेच बाहेर पडलेल्या मेहबुबांनी आपण काश्मीरात पुन्हा ३७० कलम लागू होईपर्यंत काश्मीर व्यतिरिक्त कोणताही झेंडा हाती धरणार नसल्याचे बेजबाबदार विधान केलेले आहे.


केवळ मेहबुबाच नव्हे तर ढोंगी पुरोगाम्यांचे चिरतरूण बुजगवाने असलेले फारूक अब्दुल्ला यांनी सुद्धा चीनच्या मदतीने काश्मीरात पुन्हा ३७० कलम लागू करण्याची दर्पोक्ती केलेली आहे. काश्मीरचे कित्येकदा मुख्यमंत्री पद आणि युपीए सरकारमध्ये केंद्रीय मंत्रीपद भोगलेल्या अब्दुल्लांचे बेताल वक्तव्य पाहता त्यांना म्हातारचळ तर लागले नाही ना अशी शंका येते. तसेच भारतभुमीवर खाऊन पिऊन वर पाक,चीन प्रेमाच्या उचक्या देणारे  वरील दोन्ही नेते पिकले पण शिकले नाही असे म्हणावेसे वाटते.


खरेतर हे दोघे नेते अजुनही २०१४ पुर्वीच्या स्वप्नरंजनात इतके मशगुल आहेत की काश्मीरात ऑगस्ट क्रांती होऊन तिथे यांची सद्दी संपली आहे हे त्यांच्या ध्यानातच येत नाही. जणुकाही यांच्या बापजाद्यांना जम्मू काश्मीर आंदण मिळाल्यासारखे या भुभागावर यांचा वारसाहक्क सांगतात. मात्र केंद्रात बोटचेपे सरकार जाऊन देशद्रोह्यांच्या मुसक्या आवळणारे सरकार स्थापन झाले याचे त्यांनी भान ठेवायला हवे होते. वर्षानुवर्षे पाकक्रिडेत रमलेल्या या परजीवी बांडगुळांचा ३७० आणि ३५ ए शिवाय जीव गुदमरतो आहे.


वास्तविकत: काश्मीर साठी पोलिस दल, लष्कर आणि इतरांनी अतुलनीय बलिदान केलेले आहे तसेच लाखो करोडोंचा चुराडा झाला आहे. मात्र काश्मीर प्रश्र्न सुटण्याऐवजी वर्षानुवर्षे आणखी चिघळतच चालला होता. काश्मीर प्रश्र्नाच्या राक्षसाचे प्राण ३७० नावाच्या पोपटात दडले आहे हे मोदींनी चाणाक्षपणे जाणले होते आणि एखाद्या निष्णात सर्जनसारखे गृहमंत्री अमीत शहांनी त्याची शस्त्रक्रिया करून हा प्रश्र्न मार्गी लावला आहे. अर्थातच मोदी सरकारने देशद्रोह्यांच्या मुळावर घाव घालताच परजीवी बांडगुळांचा थयथयाट अपेक्षीतच होता. मोदी सरकारने इथेच न थांबता या वळवळग्रस्तांना वठणीवर आणण्यासाठी यांची गठडीसुद्धा वळली होती. 


मात्र  कडू कारले तुपात तळले साखरेत घोळले तरी कडूच असतात. अगदी याचप्रमाणे हे नेते बाहेर येताच पुन्हा एकदा विषवमन करू लागले आहेत. हजारो सैनिकांच्या बलिदानाचा विसर पडून ही विखारी जोडी काश्मीरात आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचे दिवास्वप्न बघत आहे. मात्र हा २०१४ नंतरचा हिंदुस्थान आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे. पाक, चीनच्या साहय्याने काश्मीर खोऱ्यात पुन्हा एकदा आगलावे धंदे करणे बंद करावे. मुख्य म्हणजे केंद्रानेही असे देशद्रोही वक्तव्य करणाऱ्यांना लगेच वठणीवर आणण्यासाठी कडक पावले उचलणे अत्यंत गरजेचे आहे.


राष्ट्रध्वजाबाबत बेपर्वाई दाखवत मेहबुबांनी आपण देशाप्रती किती बेवफा आहोत हे दाखवून दिले तर ३७० साठी चीनवर भिस्त असलेले फारूक अब्दुल्ला चीनच्या प्रेमात पडल्याचे दिसून येत आहे. मात्र या दोघांचाही कठपुतळी सारखा उपयोग करुन पाकिस्तान आणि चीन ही शत्रुराष्ट्रे आपल्या देशाच्या मुळावर उठलेली आहेत हे न समजण्याइतपत इथली जनता दुधखुळी नक्कीच नाही. मेहबूबा असो की अब्दुल्ला,, अशा राष्ट्रविघातक प्रवृत्तींना इथली जनता कधीच माफ करणार नाही. 


बोटावर मोजता येतील इतक्या खासदारांच्या भरवश्यावर अब्दुल्ला आणि मेहबुबाची दुक्कल ३७० चे शिवधनुष्य कसेकाय पेलणार याचे आश्र्चर्यच वाटते. कदाचित त्यांना इथल्या मातीतल्याच काही जयचंदांवर भरवसा असावा. केंद्राने खरेतर अशा प्रवृत्तींना साथ देणाऱ्या राष्ट्रद्रोही आणि आस्तिनीतल्या निखाऱ्यांना वेचून ठेचले पाहिजे. इतकेच नव्हे तर देश, सैन्याविषयी नेहमीच विखारी वक्तव्ये आणि दुष्प्रचार करणाऱ्यांनाही उघडे पाडले पाहिजे. सोबतच स्थानिक प्रशासनात अशा देशद्रोह्यांशी संधान बांधलेले चेलेचपाटे आणि सगेसोयऱ्यांचे जाळे उध्वस्त केल्याशिवाय ही वाळवी समुळ नष्ट होणार नाही.


बरे झाले पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या काही नेत्यांनी मेहबुबांच्या वक्तव्याशी फारकत घेतली आहे. सोबतच काही राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी तिरंगा मार्च काढून मेहबुबांच्या पीडीपी कार्यालयावर  राष्ट्रध्वज फडकवत चांगले प्रत्युत्तर दिले आहे. तरीपण मेहबुबा असो की अब्दुल्ला, *केंद्राने पुन्हा एकदा त्यांचे कान टोचणे जरूरी झाले आहे.* राष्ट्रध्वज हा देशाचा मानबिंदू आहे. कोणत्याही परिस्थितीत त्याचा सम्मान राखला गेलाच पाहिजे. तसेच ३७० बाबतीत राष्ट्रद्रोही वक्तव्ये करणाऱ्यांची नांगी ठेचणे तितकेच जरूरी आहे.


************************************************

दि. २७ ऑक्टोबर २०२०

anilpawshekar159@gmail.com

+++++++++++++++++++++++++++++++++++

अब्दुल्लांची दिवानगी मेहबुबांची बेपर्वाई अब्दुल्लांची दिवानगी मेहबुबांची बेपर्वाई Reviewed by News1 Marathi on October 27, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

सन 2021-22 चा मालमत्ता कर 15 जूनपर्यत एकत्रित भरल्यास 10 टक्के सवलत

■ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा : महापौर व आयुक्तांचे आवाहन  ठाणे , प्रतिनिधी  :  ठाणे महापालिकेच्या वतीने सन 2021-22  या आर्थिक वर्षाची ...

Post AD

home ads