Header AD

कोविड उद्युक्त रक्तातील गुठळ्यांचा हृदयावर होणारा परिणाम

  


डॉ. झाकिया खान, सीनिअर इंटरव्हेन्शनल कार्डिओ लॉजिस्ट, फोर्टिस हॉस्पिटल, कल्याण...


रक्तामध्ये गुठळ्या असणा-या व्यक्तींना कफ किंवा छातीत उठणारी तीव्र कळ अशी लक्षणे जाणवू शकतात. रक्त गोठणे म्हणजे शरीराने दुखापतीला दिलेला नैसर्गिक प्रतिसाद असतो आणि अतिरिक्त रक्तस्त्राव थांबविण्यासाठी जेव्हा थोडे रक्त अर्ध-घन अवस्थेमध्ये बदलते तेव्हा ही क्रिया घडते. कोविड-१९ च्या गंभीर रुग्णांपैकी अंदाजे ३०% रुग्णांमध्ये या आजाराची परिणती रक्तात गुठळ्या होण्यामध्ये होते असे नव्याने हाती येत असलेल्या पुराव्यांवरून दिसून येत आहे. रक्तातील गुठळीमुळे (याला थ्रॉम्बस असेही म्हणतात) कोविड-१९ ची बाधा झालेल्या रुग्णांमध्ये गुंतागुंत उद्भवण्याचा व मृत्यूचा धोका वाढतो. कोविड-१९ च्या गंभीररत्या आजारी रुग्णांपैकी २०-३०% रुग्णांमध्ये या आजारामुळे रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. 


शरीरात खोलवर असलेल्या नीलांमध्ये तयार होणा-या गुठळ्या या प्रचंड धोकादायक ठरू शकतात. या गुठळ्या आपणहून विरघळत नाहीत आणि त्यांच्यामुळे रक्तप्रवाह थांबू शकतो व अशी परिस्थिती प्राणघातक ठरू शकते. काही वेळा एखाद्या गुठळीचे तुकडे होऊन ते शरीराच्या इतर भागांमध्ये पोहोचू शकतात. अशा थ्रॉम्बसला मग 'एम्बोलस' असे म्हटले जाते. हे एम्बोलस मेंदू, हृदय किंवा फुफ्फुसात पोहोचते तर हार्ट अटॅक किंवा पक्षाघातासारखी जीवघेणी परिस्थिती उद्भवू शकते. 


कोरोनाव्हायरसमुळे रक्तामध्ये गुठळ्या होण्याविषयी सध्या खूप चर्चा होत आहे. नोव्हेल कोरोनाव्हायरस जेव्हा रक्तवाहिनीच्या अस्तरामध्ये असलेल्या एंडोथेलिअल पेशींवर हल्ला करतो तेव्हा रक्तामध्ये गुठळी होण्याची क्रिया घडते असे संशोधनातून दिसून आले आहे. हा विषाणू एंडोथेलिअल पेशींच्या अंत:स्तरामध्ये असलेल्या ACE2 रिसेप्टर्सना जोडून घेत हे साध्य करतो. एकदा का हा विषाणू रिसेप्टर्सशी जोडला गेला की रक्तवाहिन्या प्रथिने उत्सर्जित करतात, ज्यांच्यामुळे रक्तामध्ये गुठळी निर्माण होते. अभ्यासातून असेही निर्देशित झाले आहे की, कोविड-१९ मुळे शरीराची रोगप्रतिकार यंत्रणा उद्दीपित होते व अतीसक्रीय होऊन जळजळीच्या रूपात प्रतिक्रिया देते. कोविड-१९ ने बाधित व्यक्तींच्या रक्तात गुठळ्या होण्यामध्ये इतरही अनेक घटकांची भूमिका असू शकते. या विषाणूसंसर्गामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची गरज असलेल्या रुग्णांमध्ये आरोग्याच्या पुढील समस्या असतील किंवा ते पुढील गटांमध्ये मोडत असतील तर त्यांच्याबाबतीत रक्तामध्ये गुठळी होण्यासाठी इतरही घटक कारणीभूत असू शकतात: 


वय जास्त असणे 

वजन प्रमाणापेक्षा जास्त असणे  

हायपरटेन्शन किंवा उच्च रक्तदाबाचा त्रास असणे 

आधीपासूनच मधुमेहाचा त्रास असणे 

रक्तामध्ये गुठळ्या होण्याचा धोका वाढविणारी औषधे सुरू असणे 

हार्ट फेल्युअरचा पूर्वेतिहास असणे 

प्रदीर्घ काळ घेतलेल्या बेडरेस्टसारख्या कारणामुळे काही काळ रुग्णाची हालचाल झाली नसल्यास  

नुकतीच एखादी शस्त्रक्रिया झाली असल्यास 

धूम्रपान करणे किंवा पूर्वी धूम्रपानाची सवय असणे 

कुटुंबामध्ये डीव्हीटी किंवा पल्मोनरी एम्बोलिझमचा पूर्वेतिहास असणे 

ब्लड क्लॉटिंग डिसॉर्डरचे रुग्ण 


रक्तामध्ये गुठळी झाल्यामुळे हृदयाच्या कार्यात निर्माण होणा-या गुंतागुंती:  कोविड-१९ ची लागण झालेल्या व्यक्तींच्या रक्तामध्ये खूप जास्त प्रमाणात गुठळ्या निर्माण झाल्यास या संसर्गामुळे निर्माण होणा-या अनेक गुंतागुंतींना त्या कारणीभूत ठरू शकतात. संशोधनातून असे दिसून आले आहे की, कोविड-१९ असलेल्या व्यक्तींमध्ये रक्त गोठण्याच्या प्रक्रियेचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे अतिशय विपरित परिणाम संभवू शकतात. अशा रुग्णांना अतिदक्षता विभागामधील उपचारांची गरज लागू शकते. 

 

हृदयाला इजा पोहोचणे:  धमन्यामध्ये रक्ताची गुठळी झाल्यास हार्ट अटॅक येऊ शकतो किंवा हृदयामध्ये इतर काही गुंतागुत उद्भवू शकते. चीनमधील वुहान येथील एका हॉस्पिटलमध्ये कोविड-१९ असलेल्या १८७ रुग्णांच्या केलेल्या पाहणीच्या निष्कर्षांमध्ये २७.८% रुग्णांच्या हृदयाला इजा पोहोचल्याचे दिसून आले. 


सध्या उपलब्ध व विकसित होणा-या उपचारपद्धती: या समस्येवरील उपचारांमध्ये रक्त पातळ करणा-या औषधांचा समावेश होतो. अनेक डॉक्टर्स रक्तात गुठळी होण्याचा धोका कमी करण्यासाठी रुग्णाच्या हॉस्पिटलमधील वास्तव्यादरम्यान हे औषध सुरू करतात व ते डिस्चार्जनंतर २ आठवड्यांपर्यंत चालू ठेवले जाते. असे असले तरीही, रक्त पातळ करणा-या औषधांमुळे रक्तस्त्रावाचा धोका वाढतो. त्यामुळे अतिधोकादायक गटातील व्यक्तींना ही औषधे चालू शकत नाहीत. कोविड-१९ मुळे यांत्रिक व्हेंटिलेशनवर असलेल्या ज्या रुग्णांनी ही औषधे घेतली नाहीत अशा रुग्णांच्या तुलनेत हे औषधोपचार सुरू असणा-या रुग्णांचा मृत्यूदर अधिक असल्याचे काही अहवालांतून दिसून आले आहे. सध्या या समस्येवर उपचार करण्यासाठी व रक्तामध्ये गुठळ्या होण्याची प्रक्रिया थांबविण्यासाठी नव्या पर्यायी उपचारांची चाचणी संशोधकांकडून केली जात आहे. 


प्रतिबंध:  नोव्हेल कोरोनाव्हायरसच्या संसर्गाला प्रतिबंध करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे हाताची उत्तम स्वच्छता पाळण्याची सवय लावून घेणे, मास्क घालणे आणि एकमेकांपासून अंतर राखून राहणे. रक्तामध्ये गुठळी होण्याचा धोका अधिक असलेल्या रुग्णांनी आपल्या डॉक्टरांशी चर्चा करायला हवी. काही प्रकरणांमध्ये डॉक्टर्स रक्त पातळ करणा-या औषधांचा वापर करण्याचा सल्ला देऊ शकतात. मात्र, ही औषधे सगळ्यांना चालण्यासारखी नाहीत हे ही खरे. 


रक्तामध्ये गुठळ्या होण्याचा धोका कमी करण्याचे इतर काही मार्ग पुढीलप्रमाणे: 


शक्य तितके सक्रिय राहणे

रक्ताभिसरण सुधारण्यासाठी खास प्रकारचे स्टॉकिंग्ज वापरणे 

डिहायड्रेशऩ होऊ नये यासाठी भरपूर पाणी पिणे 

गरज भासल्यास, वजन कमी करणे. 

मद्यपान आणि तंबाखू सेवन टाळणे 


तात्पर्य: नोव्हेल कोरोनाव्हायरसमुळे काही लोकांच्या रक्तामध्ये गुठळ्या का तयार होतात याचे कारण तज्ज्ञांना अजूनही पूर्णपणे कळलेले नाही. या गुठळ्या बरेचदा फुफ्फुसांत तयार होतात, पण शरीराच्या इतर भागांतही त्या तयार होऊ शकतात. रक्तातील गुठळ्यामुळे पक्षाघात, हृदयाचे आजार अशा इतर गुंतागुंती निर्माण होण्याचा धोका वाढतो. मात्र, कोविड-१९ ची लागण झालेल्या बहुतांश लोकांमध्ये या आजाराची सौम्य ते मध्यम स्वरूपाची लक्षणेच आढळून येतात व कोणतीही गुंतागुंत न होता ते या आजारातून बरे होतात ही गोष्ट इथे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे.


कोविड उद्युक्त रक्तातील गुठळ्यांचा हृदयावर होणारा परिणाम कोविड उद्युक्त रक्तातील गुठळ्यांचा हृदयावर होणारा परिणाम Reviewed by News1 Marathi on October 05, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads