Header AD

अगंबाई अरेच्चा कोलकाता समोर राजस्थानची शरणागतीलेखक | डॉ अनिल पावशेकर..

दुबईत खेळल्या गेलेल्या कोलकाता विरूद्ध राजस्थान सामन्यात स्मिथच्या रॉयल संघाने दिनेश कार्तिकच्या नाईट रायडर्स समोर सपशेल शरणागती पत्करून हार ओढवून घेतली. १२० चेंडूत १७५ धावांचे आव्हान स्मिथचा संघ झेलू शकला नाही आणि त्यांना मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले. जिंकण्यासाठी पाऊने दोनशे धावांचे खडतर लक्ष्य असतांना *बटलर वगळता इतर फलंदाज लवकर तंबूत परतल्याने* त्याचा फटका संघाला बसला. तसेच आठव्या षटकातच राजस्थानच्या अर्ध्या संघाचा खुर्दा उडवत कोलकाताने स्मिथच्या आशा आकांक्षावर पाणी फेरले होते.


नाणेफेक जिंकून स्मिथने गोलंदाजी पत्करली आणि कोलकाता संघाच्या शुभमन गिल, सुनिल नरेनने आक्रमक सुरूवात केली. सुनील नरेन हा नावाजलेला फलंदाज नाही मात्र प्रारंभी येऊन तो चांगल्या गोलंदाजीचे वाभाडे नक्कीच काढू शकतो. लगेच जयदेव *उनाडकटने त्याची उनाडकी लवकरच संपवत* राजस्थान संघाला बोहणी करून दिली. दुसऱ्या टोकाला *शुभमन गिलच्या शुभ फलंदाजीने* कोलकाता संघाची दमदारपणे वाटचाल सुरू होती. राणाच्या रुपात दुसरा बळी जाताच दिनेश कार्तिकने आपले अमोघ अस्त्र आंद्रे रसेलच्या रुपाने मैदानात उतरवले. मात्र स्टिव्ह स्मिथही कसलेला कर्णधार आहे आणि त्याने *आंद्रे रसेलचा ॲंटीडोज* म्हणून जोफ्रा आर्चरच्या हातात चेंडू सोपवला.


आंद्रे रसेल आणि जोफ्रा आर्चरच्या द्वंदाची क्रिकेट रसिकांना पर्वणी पहायला मिळणार होती. कारण रसेल एकदा रंगात आला की त्याचे विकेटवर तांडव सुरू होते आणि भल्याभल्या गोलंदाजांना तो *दे माय धरणी ठाय* करून सोडतो. त्याच्या फायरींग रेंजमध्ये चेंडू आल्यास *क्षेत्ररक्षक हे प्रेक्षकात रुपांतरीत होतात*. शिवाय बॅटचा तडाखा चेंडूवर बसला तरी त्याचे वळ गोलंदाजांच्या पाठीवर उमटत असतात. त्यामुळे रसेलला दुरुनच रामराम करण्यात गोलंदाज धन्यता मानत असतात. मात्र यावेळी फासे उलटे पडले, रसेलसाठी लावलेल्या जाळ्यात रसेल ऐवजी शुभमन गिल फसला आणि जोफ्रा आर्चरच्या वेगाला तो बळी पडला.


सध्यातरी जोफ्रा आर्चर हा क्रिकेट जगतातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजांपैकी एक आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. व्हिस्परींग डेथ म्हणून गाजलेल्या मायकेल *होल्डींगची अचूकता आणि भेदक माल्कम मार्शलचे डेडली कॉम्बीनेशन* असलेला जोफ्रा आर्चर फलंदाजांचा कर्दनकाळ ठरतो आहे. तुलनेत छोट्या आणि सहजसुंदर रनअपने गोलंदाजी करत तो कमालीचा वेग आणि अचूकता साधतो. मुख्य म्हणजे फलंदाज त्याचे चेंडू खेळत नाही तर हा पठ्ठ्या फलंदाजांना वेग आणि बाऊंसच्या साहय्याने अक्षरश: खेळवतो. शुभमन गिल ज्याप्रकारे बाद झाला ते पाहता त्याला स्वत:ही बाद होण्यापेक्षा जोफ्राच्या चेंडूचे कौतुक करावेसे वाटले असणार.


शुभमन पाठोपाठ दिनेश कार्तिकलाही माघारी धाडत जोफ्राने आपली कामगिरी चोखपणे बजावली. अखेर दुसऱ्या टोकाला आंद्रे रसेलचाही संयम सुटला आणि तो अंकीत राजपूतचा बळी ठरला. मात्र यानंतर पॅट कमीन्स आणि इऑन मॉर्गनने डाव सांभाळत संघाला दिडशेच्या जवळ पोहचविले. कमीन्स बाद होताच *मॉर्गनने आपले हात मोकळे करत* २३ चेंडूत ३४ धावा केल्या आणि संघाला १७४ चा समाधानकारक पल्ला गाठून दिला. स्मिथने कोलकाता फलंदाजांना आवरण्यासाठी तब्बल सात गोलंदाजांना कामाला लावले परंतू जोफ्रा आर्चर वगळता इतर गोलंदाज तेवढे प्रभावी ठरले नाही.


राजस्थानचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ बटलरच्या साथीने मैदानात उतरला खरा परंतू १७५ धावांची चिंता त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. त्यातच त्याला फलंदाजीतील घिसडघाई चांगलीच नडली. *अति घाई संकटात नेई* प्रमाणे त्याची खेळी लवकरच संपुष्टात आली. शिवाय पॅट कमीन्स सारख्या दर्जेदार गोलंदाजाला आदर द्यायला तो विसरला. पॅट कमीन्सला पिटायच्या नादात स्मिथवरच बाजी पलटली आणि राजस्थान संघाला ह्रदयविकाराचा पहिला झटका आला. तरीपण खेळपट्टीवर बटलर सोबत सध्या तुफान फॉर्मात असलेला संजू सॅमसन उभा होता आणि या दोघांपैकी एकाला मोठी आणि झंझावाती खेळी करणे गरजेचे होते. पाचव्या षटकातच संजू सॅमसनने मैदान सोडताच राजस्थान संघ आचके देऊ लागला.


बटलर वगळता टॉप ऑर्डरच्या इतर चार फलंदाजांनी  ३, ८, २, १ अशी धावसंख्या उभारताच राजस्थानचा पराभव ही *काळ्या दगडावरची रेघ* होती. नाही म्हणायला संघात उथप्पा, पराग आणि तेवटीया जरूर होते. मात्र *चमत्कार वारंवार होत नसतात* हेच खरे ठरले. स्मिथ, सॅमसन बाद होताच इतर फलंदाजांनी तू चल मै आया केल्याने राजस्थानला पराभवा पासुन कोणीही वाचवू शकले नाही. पॅट कमीन्सला शिवम मावी सोबतच नागरकोटी आणि वरूण चक्रवर्तीने तोलामोलाची साथ देत राजस्थानचा डाव लवकर गुंडाळण्यास मदत केली. कोलकाता गोलंदाजांच्या चांगल्या कामगिरीची पेक्षा राजस्थानच्या फलंदाजांची हाराकिरी सामन्याचा निकाल ठरवून गेली.


दि. ०१ ऑक्टोबर २०२०

डॉ अनिल पावशेकर

मो. ९८२२९३९२८७

anilpawshekar159@gmail.com

अगंबाई अरेच्चा कोलकाता समोर राजस्थानची शरणागती अगंबाई अरेच्चा कोलकाता समोर राजस्थानची शरणागती Reviewed by News1 Marathi on October 01, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

महावितरण शेतकऱ्यांच्या बांधावर शहापूर येथील मेळाव्यात ४२ थकबाकीमुक्त शेतकऱ्यांना प्रमाणपत्र प्रदान

कल्याण: ०७ मार्च २०२१  :   महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या व  महावितरणकडून अंमलबजावणी सुरु असलेल्या 'कृषिपंप धोरण-२०२०' अंतर्गत चा...

Post AD

home ads