चिपळुणातील धम्मदीप बुद्ध विहाराचा 16 वा वर्धापन दिन साजरा
चिपळूण | प्रतिनिधी : चिपळूण शहरातील धम्मदीप बुद्ध विहाराचा 16 वा वर्धापन दिन कोरोनाची आवश्यक ती खबरदारी घेवून साध्या पद्धतीने आज साजरा करण्यात आला. चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समिती, विभाग चिपळूण, शाखा चिपळूण यांच्या वतीने बौद्ध वसाहतीतील धम्मदीप बुद्ध विहाराच्या वर्धापन दिनाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच शाखेचे माजी अध्यक्ष गौतम जाधव व धोंडीराम सकपाळ व इतर दिवंगत सभासदांची श्रध्दांजली सभाही घेण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिद्धार्थ परशुराम जाधव हे होते. तर यावेळी सामाजिक राजकीय कार्यकर्ते राजूभाई जाधव, संस्थेच्या शिक्षण समितीचे अध्यक्ष संदेश पवार, धम्म कमिटीचे माजी अध्यक्ष प्रभाकर सकपाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रथमतः प्रभाकर सकपाळ यांच्या हस्ते बौद्ध पूजापाठ घेण्यात आला.
यावेळी बोलताना राजूभाई जाधव यांनी धम्मदिप बुद्ध विहाराच्या उभारणीत महत्वाचे योगदान असणार्या सर्व लोकांचे, जमीन देणगीदार यांचे विशेष अभिनंदन केले. तसेच शाखेचे दिवंगत अध्यक्ष गौतम जाधव यांच्या कार्यकतृत्वावर प्रकाश झोत टाकला. तसेच शाखेचे जेष्ठ सभासद धोंडीराम सकपाळ यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी सिद्धार्थ जाधव , प्रभाकर सकपाळ, संदेश पवार यांनी समयोचित विचार मांडले. दिवंगत सभासदांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी बी वाय जाधव आणि त्यांच्या चार इतर कुटुंबानी आपल्या मूळ संस्थेत - हितसंरक्षक समितीत प्रवेश केला. प्रारंभी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस बी वाय जाधव यांनी व बुद्ध प्रतिमेस अध्यक्ष सिद्धार्थ जाधव यांनी पुष्प वाहिले. दीपप्रज्वलन प्रकाश जाधव व शंकर जाधव यांनी केले. सूत्रसंचालन सरचिटणीस सुधाकर मोहिते यांनी केले. कार्यक्रमाला शाखेचे व महिला मंडळाचे सभासद, बालके उपस्थित होते.

Post a Comment