Header AD

“माझे कुटुंब-माझी जबाबदारी” मोहिमेत नागरिकांनी सक्रीय सहभागी व्हावे महापौर नरेश म्हस्के यांचे आवाहन


ठाणे  | प्रतिनिधी  :  राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ ही मोहिम महापालिका कार्यक्षेत्रात कार्यान्वित करण्यात आली असून, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, स्वयंसेवी संस्था, कार्यकर्ते व समस्त ठाणेकरांनी या मोहिमेत सक्रीय सहभागी होवून आपल्या कुटूंबाचे जीवन सुरक्षित करावे असे आवाहन महापौर नरेश म्हस्के यांनी केले आहे.


कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन लागू करण्यात आले होते, परंतु लॉकडाऊन शिथील झाल्यावर मागील दोन आडवडयात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे ही अत्यंत गंभीर बाब आहे. कोविड-19 वर नियंत्रण आण्यासाठी जनतेचा सहभाग आवश्यक आहे.  यासाठी शासनाने निर्देश दिल्यानुसार माझे कुटूंब, माझी जबाबदारी ही मोहिम ठाण्यामध्ये पालकमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व महापालिका आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांच्या नेतृत्वाखाली 15 सप्टेंबर ते 25 ऑक्टोबर 2020 या कालावधीत राबविण्यात येणार आहे.  या अंतर्गत दि.17 सप्टेंबर ते दि.10 ऑक्टोबर 2020  अशी 15 दिवस पहिली मोहिम तर दि.14 ऑक्टोबर ते दि.24 ऑक्टोबर 2020 अशी 10 दिवस दुसरी मोहिम असणार आहे.  यासाठी ठाण्यातील अंदाजे 25 लक्ष लोकसंख्या गृहीत धरुन एकूण 453 पथके तयार करण्यात आलेली आहे.  यामध्ये काम करणाऱ्या सदस्यांना करोना दुत म्हणून संबोधण्यात येईल. सदरची मोहिम यशस्वी करण्यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचा सहभाग महत्वाचा आहे असेही महापौर यांनी यावेळी नमूद केले.


या मोहिमेमध्ये घरोघरी भेटी देण्यासाठी आरोग्य पथके तयार करण्यात आलेली आहे.  एका पथकामध्ये 1 आरोग्य कर्मचारी व 2 स्वयंसेविका असतील व हे पथक दररोज 50 घरांना भेट देणार आहे. यावेळी घरातील सर्व सदस्यांचे तापमान तपासणे, को-मॉर्बिड कंडिशन आहे किंवा नाही याची माहिती घेतली जाईल. ताप, खोकला, दमा लागणे, SPO2 कमी असणे अशी कोविड सदृश्य लक्षणे असणाऱ्या व्यक्तींना जवळच्या फिवर क्लिनिकमध्ये पाठविण्याची व्यवस्था करण्यात येईल. फिवर क्लिनिकमध्ये कोविड-19 ची तपासणी करुन तातडीने पुढील उपचार करण्यात येतील.  को-मॉर्बिडीटी असणारे रुग्ण नियमितपणे उपचार घेतात की नाही याची देखील यावेळी खात्री करण्यात येईल. तसेच घरातील सर्व सदस्यांना व्यक्तिश: प्रि-कोविड, कोविड आणि पोस्ट-कोविड स्थितीबाबत आरोग्य शिक्षण देण्यात येणार आहे.


महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार महापालिका प्रशासन माझे कुटूंब, माझी जबाबदारी ही मोहिम राबविण्यासाठी सज्ज झाले असून, महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या मोहिमेला सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, सामाजिक संस्था कार्यकर्ते नागरिकांनी सहभाग देवून मोहिम यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान द्यावे व कोरोनाचा समूळ नायनाट करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन महापौर नरेश म्हस्के यांनी यावेळी केले.  तर आजवर महापालिकेला सर्वांनी केलेल्या सहकार्याबद्दल महापौरांनी सर्वांचे आभार देखील व्यक्त केलेत.

“माझे कुटुंब-माझी जबाबदारी” मोहिमेत नागरिकांनी सक्रीय सहभागी व्हावे महापौर नरेश म्हस्के यांचे आवाहन “माझे कुटुंब-माझी जबाबदारी” मोहिमेत नागरिकांनी सक्रीय सहभागी व्हावे  महापौर नरेश म्हस्के यांचे आवाहन   Reviewed by News1 Marathi on September 16, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads