Header AD

कोरोनाच्या आपत्तीतही सर्वेक्षण कंपन्यांवर कोट्यवधींची उधळण! भाजपा नगरसेवक नारायण पवार यांचा आरोप


ठाणे  | (प्रतिनिधी) : कोरोनाच्या आपत्तीमुळे महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट झाली असताना, ठाणे महापालिकेकडून सर्वेक्षण करणाऱ्या कंपन्यांवर कोट्यवधींची उधळण सुरूच आहे. आतापर्यंत सर्वेक्षणानंतर तयार केलेले प्रकल्प फसलेले असतानाही महापालिकेचे डोळे उघडलेले नाहीत, असा आरोप करीत भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी स्वच्छ सर्वेक्षण सल्लागारासाठी ३ कोटी ६४ लाख रुपयांचा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी केली आहे. 


कोरोनामुळे महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. एकीकडे नागरिकांना दिलासा देण्यासाठी मालमत्ता कर व पाणीपट्टी कर आकारणीत सवलत देण्याच्या विषयावर महासभेत चर्चाही होत नाही. कंत्राटदारांना देण्यासाठी पैसे नसल्यामुळे शहरातील अनेक विकासाची कामे ठप्प झाली आहेत. महापालिकेला दर महिन्याचा खर्च भागविण्यासाठी मुदतठेवी मोडण्याची वेळ आली. अशा परिस्थितीत महापालिकेने अनावश्यक खर्च वाचविण्याची गरज आहे. मात्र, १८ सप्टेंबर रोजीच्या महासभेत स्वच्छ सर्वेक्षण सल्लागार नेमण्यासाठी ३ कोटी ८४ लाखांच्या प्रस्ताव सादर करण्यात आला आहे, याकडे नारायण पवार यांनी लक्ष वेधले आहे.

महापालिकेच्या घनकचरा, आरोग्य विभागासह विविध विभागांमध्ये तज्ज्ञ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, सातत्याने सल्लागार नेमण्याच्या निर्णयांमुळे महापालिकेचा आपल्याच अधिकाऱ्यांवर विश्वास नसल्याचे स्पष्ट होत आहे. आतापर्यंत स्मार्ट सिटी, सॅटीस, उड्डाणपूल, एकात्मिक नालेबांधणी, मलवाहिनी प्रकल्प, ट्राम रेल्वे, रिंग रूट प्रकल्प, खाऱ्या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर आदी प्रकल्पात सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. स्मार्ट सिटीची बहूसंख्य कामे रखडलेली आहेत. काही कामे १ टक्का पूर्ण झाली. सॅटीस पूलाखाली अग्निशमन वाहन जात नाही. मीनाताई ठाकरे चौकातील उड्डाणपूलावरुन एकेरी वाहतूक सुरू आहे, चौकाचौकात नाले व मलनिस्सारण वाहिन्या चोकअप होत असल्याच्या सातत्याने प्रकार होत आहेत. ट्राम रेल्वे, रिंगरुट व खाऱ्या पाण्याचा प्रकल्प गुंडाळण्यात आला अशा परिस्थितीत सल्लागारांचा उपयोग काय? सल्लागारांच्या माध्यमातून कोणाच्या तुंबड्या भरल्या जात आहेत, असा सवाल नगरसेवक नारायण पवार यांनी आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांना पाठविलेल्या पत्रात केला आहे.

-------------------------------------
...तर अधिकाऱ्यांच्या पगारातून
सल्लागाराचा खर्च घ्या : नारायण पवार
गेल्या काही वर्षात तांत्रिक सल्लागाराच्या नियुक्तीच्या माध्यमातून महापालिकेचे पर्यायाने ठाणेकरांचे कोट्यवधी रुपये पाण्यात गेले आहेत. महापालिकेतील अधिकारी अकार्यक्षम असल्याचे मानून सल्लागार नियुक्तीचा निर्णय घेतला जात असल्यास, प्रत्येक प्रकल्पातील अधिकाऱ्यांच्या वेतनातून सल्लागारांचा खर्च घ्यायला हवा, असे मत नगरसेवक नारायण पवार यांनी व्यक्त केले आहे.
कोरोनाच्या आपत्तीतही सर्वेक्षण कंपन्यांवर कोट्यवधींची उधळण! भाजपा नगरसेवक नारायण पवार यांचा आरोप कोरोनाच्या आपत्तीतही सर्वेक्षण कंपन्यांवर कोट्यवधींची उधळण! भाजपा नगरसेवक नारायण पवार यांचा आरोप Reviewed by News1 Marathi on September 13, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads