Header AD

वेब महासभेचे कामकाज अनाकलनीय! नारायण पवार यांची टीका


ठाणे, दि. ८ (प्रतिनिधी) : महापालिकेच्या आज झालेल्या वेब महासभेचे कामकाज अनाकलनीय होते, अशी टीका भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी केली आहे. जानेवारी-फेब्रुवारी, मार्चमधील खंडित महासभांमधील विषय घाईघाईत मंजूर करण्यात आले. कोणते विषय मंजूर झाले, ते बहूतांशी नगरसेवकांना समजले नाही. त्यामुळे विधीमंडळाच्या धर्तीवर नगरसेवकांची कोरोना चाचणी घेऊन गडकरी रंगायतन किंवा डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात महासभा भरवावी, अशी विनंती नगरसेवक नारायण पवार यांनी महापौर नरेश म्हस्के यांच्याकडे केली आहे.

गेल्या पाच महिन्यांत महासभा न झाल्यामुळे ठाणे शहरातील अनेक महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा होण्याची अपेक्षा होती. मात्र, आजच्या महासभेने ती फोल ठरली. महासभेमध्ये कोणते अधिकारी, कोणते नगरसेवक उपस्थित आहेत, याची माहिती मिळत नव्हती. अधिकाऱ्यांनी केलेले स्पष्टीकरण समजू शकले नाही. त्यामुळे या महासभेच्या आयोजनाचा मूळ उद्देशच फसला आहे. सत्ताधारी शिवसेनेच्याही बहूतांशी नगरसेवकांचीही हीच भावना असेल, असे नगरसेवक नारायण पवार यांनी सांगितले.

शहरातील कोरोनाची स्थिती, मालमत्ता कर व पाणीपट्टी करामध्ये नागरिकांना दिलासा, महापालिकेची आर्थिक स्थिती आदींबाबत महासभेत खुलासा होण्याची अपेक्षा होती. मार्चच्या कार्यक्रमपत्रिकेत लाखो ठाणेकरांच्या हिताच्या क्लस्टर विषयावर चर्चा होणार होती. मात्र, त्याबाबत काहीही निर्णय वा चर्चा झालेली नाही. या सभेत जनहिताच्या प्रश्नांची चर्चा होत नसल्यामुळे आपण सभात्याग केला, अशी माहिती नगरसेवक नारायण पवार यांनी दिली. या सभेचे कामकाज पत्रकारांसाठीही खुले ठेवण्याची आवश्यकता होती. मात्र, पत्रकारांना मज्जाव करण्यात आला. या सभेतील निर्णयांबाबत लपवालपवी करण्याची गरज का होती, असा सवालही नारायण पवार यांनी केला आहे.
विधीमंडळाच्या धर्तीवर गडकरी रंगायतन किंवा डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात महासभा भरवावी. त्याआधी नगरसेवकांची कोरोना चाचणी करावी. त्यानंतर महासभा भरविल्यास महत्वपूर्ण विषयांवर चर्चा होऊ शकेल. तरी आपण यासंदर्भात निर्णय घ्यावा, अशी विनंती नगरसेवक नारायण पवार यांनी महापौर नरेश म्हस्के यांच्याकडे केली आहे.
वेब महासभेचे कामकाज अनाकलनीय! नारायण पवार यांची टीका वेब महासभेचे कामकाज अनाकलनीय! नारायण पवार यांची टीका Reviewed by News1 Marathi on September 08, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads